भर पावसात 'कावेसर वाचवा' घोषणा ! रहिवाशांचा कावेसर तलाव सुशोभिकरणाला विरोध
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या कॉंक्रिटीकरणासह प्रस्तावित सुशोभीकरणाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध सुरू असून, हा विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज मुसळधार पावसातही शेकडो रहिवाशांनी ‘कावेसर तलाव वाचवा’ अशा घोषणा देत पुन्हा एकदा तलाव परिसरात रॅलीच्या माध्यमातून एल्गार केला. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी तलावाच्या काठावर निदर्शने करून रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ‘सेव्ह कावेसर लेक सिटीझन्स मुव्हमेंट’ ही ऑनलाइन चळवळ उभारली गेली असून, याचिकेवर हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून कावेसर तलावाच्या नैसर्गिक रचनेला धक्का लावणाऱ्या सुशोभीकरणाला विरोध दर्शविला आहे.
रहिवाशांचा आरोप आहे की, ठाणे महापालिकेने तलावाच्या सौंदर्यीकरणाचा निर्णय स्थानिकांना विश्वासात न घेता घेतला असून तो त्यांच्यावर लादला आहे. यामुळे हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, पातलीपाडा परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटित होत, कावेसर तलाव वाचवण्यासाठी मोठी चळवळ उभी केली आहे.
रॅली दरम्यान अनेक रहिवाशांनी तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कावेसर तलाव हे शहरात उरलेले काही मोजके नैसर्गिक जलस्रोतांपैकी एक आहे. या परिसरात विविध प्रकारचे पक्षी, झाडे आणि जैवविविधता आढळते, त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी हा तलाव त्याच्या मूळ स्वरूपात जपला गेला पाहिजे. रहिवाशांनी मागणी केली की, कावेसर तलावाचा परिसर ‘सायलेंट झोन’ म्हणून जाहीर करावा आणि कोणत्याही प्रकारचे कॉंक्रिटीकरण टाळून, नैसर्गिक पद्धतीनेच देखभाल केली जावी.
एका ज्येष्ठ नागरिक महिलेने भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की, “आम्हाला मातीतून चालणं आवडतं. रस्तेच सगळीकडे झाले आहेत, इथे तरी निसर्गाला राहू द्या.” सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल, जमीन सपाटीकरण, आणि बागांऐवजी सिमेंटने झाकलेले मार्ग हे निसर्गाच्या विरोधात जाणारे पाऊल असल्याचेही अनेकांनी स्पष्ट केले.
रहिवाशांचा स्पष्ट इशारा आहे की, महापालिकेने हा निर्णय मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. कावेसर तलाव हा केवळ एक जलस्रोत नसून, संपूर्ण परिसराचा श्वास आहे, तोच वाचवण्यासाठी हा संघर्ष आहे.