PCMC Medical Department sends notice to 650 hospitals, warns them not to take deposits
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑपरेशनच्या पूर्वी पैशांची मागणी केल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. यामुळे विरोधकांसह सत्ताधारी नेते देखील आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. मंगेशकर रुग्णालयामधील डीन धनंजय केळकर यांनी रुग्णालयातील डिपॉझिट घेण्याची पद्धत बंद केले असल्याचे जाहीर केले आहे. मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर आता पुण्यातील इतर रुग्णालयांना आणि प्रशासनाला जाग आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महिलेला ऑपरेशन करण्यापूर्वी 10 लाखांची मागणी करण्यात आली. यामुळे रुग्णाच्या मानसिकतेवर परिणाम होत असून पैसे उपलब्ध होईपर्यंत उपचार करण्यास देखील दिरंगाई केली जाते. यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कोणत्याच रुग्णालयाने रुग्णाकडून डिपॉझिटची मागणी करु नये. तसेच मागणी केल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड पालिकेकडून देण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारापूर्वी ऍडव्हान्ससाठी मुजोरी दाखवली अन तनीषा भिसेंचा यात बळी गेला. यानंतर पिंपरी चिंचवड पालिका देखील खडबडून जागी झाली आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने 650 रुग्णालयांना नोटिसा धाडल्या आहेत. कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. असा इशारा पालिकेने या नोटीसीद्वारे दिलाय. याबाबत वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणेंनी अधिकची माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी रुग्णालयांना नोटीस पाठवली असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, “शहरातील 650 रजिस्टर रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे. रुग्णालयामध्ये येणाऱ्या अतितात्काळ आणि तात्काळ उपचारासाठी जे रुग्ण येतील त्यांच्यावर पहिल्यांदा तप्तरतेने उपचाप करणे आवश्यक आहे. बाकी इतर सर्व गोष्टी नंतर बघता येतील. यामध्ये डिपॉझिट देखील येते,” असे स्पष्ट मत डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “पालिकेकडून रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग एक्टनुसार रजिस्ट्रेशन देण्यात आले आहेत. त्यामुळे या कायद्यांतर्गत येणारी दंडात्मक कारवाई ही केली जाणार आहे. यामध्ये रुग्णालयांना नोटीस देणे. नोटीसमधून खुलासा मागणे आणि सक्त सूचना देणे. तसेच दंडात्मक कारवाईचा देखील समावेश आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका होत असतील तर रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करु शकतो,” असा आक्रमक पवित्रा पिंपरी चिंचवड पालिका वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देखील चौफेर टीका झाल्यानंतर जाग आली आहे. रुग्णालयातील डिपॉझिटबाबत मत व्यक्त करताना डीन धनंजय केळकर म्हणाले की, “रुग्णालयामध्ये डिपॉझिट हे फक्त मोठ्या शस्त्रक्रियांसाठी घेतले जात होते. रुग्ण गरिब असेल तर ते देखील घेतले जात नव्हते. जे रुग्ण भरु शकतात त्यांच्याकडून घेतले जात होते. तो आता वादाचा मुद्दा न करता ते आम्ही बंद केलं आहे. यापुढे डिपॉझिट घेतले जाणार नाही,” अशी माहिती धनंजय केळकर यांनी दिली आहे.