पेणमधील विक्रम मिनिडोअर स्टँडबाबत टांगती तलवार कायम (फोटो सौजन्य-X)
Pen News In Marathi : पेण शहरातील एसटी स्टॅण्ड समोरील नुतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगवर पेण नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करणेचे नियोजन केले होते. यावेळी पेण विक्रम मिनिडोअर संघटनेच्यापाठी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विजय पाटील,अध्यक्ष कल्पेश पाटील,नंदा म्हात्रे, मंगेश दळवी ठामपणे उभे असल्याने विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगबाबत पेण नगरपरिषदेने घेतलेला पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला आज पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले, असे असले तरी टांगती तलवार कायम आहे.
खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण विक्रम मिनिडोअर संघटनेच्या हिताची बाजू मांडत विक्रम मिनिडोअर स्टँड वरील नगरपालिकेची कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी यावेळी उपस्थित खासदार धैर्यशील पाटील, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी,चालक यांची बाजू एकूण घेऊन आज पोलीस बंदोबस्तात होणारी कारवाईला स्थगिती दिली आहे. पण पुढे दोन तीन दिवसात चर्चे नंतर कारवाई होणार असल्याचे प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले.
विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या पार्किंगवर नगरपालिकेने कारवाई करू नये यासाठी मोठ्या संख्येने विक्रम मिनीडोअर चालक मालक उपस्थित होते तर अनुचित प्रकार घडून नये यासाठी पेण उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे,पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोयनाड पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या उपस्थितीत पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता.
शहरातील एसटी स्टॅण्डसमोरील नूतन भाजी मंडईजवळील पार्किंग जागेवर विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटना गेली अनेक वर्षे आपली वाहने उभी करत आहे. मात्र ही जागा अतिक्रमित असल्याने पेण नगरपरिषद प्रशासनाने २८ व २९ मे रोजी पोलीस बंदोबस्तात गाड्या हटविण्याची कारवाई करण्याचे नियोजन केले होते. या कारवाईला विरोध करत विक्रम मिनीडोअर संघटनेने नगर परिषद प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन छेडले. संघटनेने हक्काच्या जागेची मागणी करत आंदोलनादरम्यान नगर परिषदेला निवेदन दिले. त्यानंतर मुख्याधिकारी यांच्या दालनात संघटनेच्या प्रतिनिधी व समविचारी लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर नगर परिषद प्रशासनाने कारवाईची तारीख पुढे ढकलून ३ जून २०२५ रोजी निश्चित केली. त्यामुळे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे.