
गृहप्रकल्पांच्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
धूळ आणि राडारोड्यामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने खालावली
हिंजवडी परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात (PCMC) आणि उपनगरांमध्ये सध्या सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकामांतून उडणारी धूळ आणि राडारोड्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) रविवारी २३२ वर पोहोचला आहे. विशेषतः वाकड आणि हिंजवडी परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, येथील रहिवाशांना श्वसनाचे विकार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाकड ठरतेय ‘प्रदूषणाचे हॉटस्पॉट’
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्वाधिक प्रदूषित हवा वाकड आणि हिंजवडी भागात नोंदवण्यात आली आहे. वाकडमधील भूमकरनगर भागात रविवारी दुपारी ४ वाजता हवेची गुणवत्ता ‘अतिखराब’ (Very Poor) श्रेणीत होती. येथील हवेत सूक्ष्म धूलिकणांचे (PM 2.5) प्रमाण ३०७ पर्यंत वाढले आहे, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते.
GRAP-4 in Delhi: शाळांच्या नियमात बदल, ५०% कर्मचारी करणार घरातून काम, दिल्लीत GRAP-4 निर्बंध लागू
रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांचा विळखा
वाकड आणि हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना साहित्याचा पुरवठा करणारे अनेक ‘रेडी मिक्स काँक्रीट’ (RMC) प्लांट या परिसरात कार्यरत आहेत. या प्लांटमधून उडणारी सिमेंटची धूळ आणि कच्च्या मालाची वाहतूक यामुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुण्यनगरीची हवा ‘विषारी’
पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) सातत्याने ‘मध्यम’ (१०१-२००) ते ‘खराब’ (२०१-३००) या श्रेणीत नोंदवली जात आहे. असे असतानाही पुणे महापालिकेकडून (पीएमसी) ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (जीआरएपी) अंतर्गत आवश्यक उपाययोजना प्रत्यक्षात राबविल्या जात नसल्याने पर्यावरण तज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जीआरएपी’मध्ये ‘मध्यम’ आणि ‘खराब’ या दोन्ही श्रेणी एकत्र करून सात ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती, कचरा जाळण्यावर कडक बंदी व दंडात्मक कारवाई, बांधकाम स्थळांवरील धूळ नियंत्रण आणि नियमांचे पालन न करणाऱ्या ठिकाणी काम बंद करण्याच्या उपायांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे.