वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय, अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत वाढ; सकाळी 8 नंतर...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि परिणामी निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे. यापूर्वी सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत लागू असलेली बंदी आता सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ या कालावधीत लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, म्हाळुंगे, तळेगाव दाभाडे ही महत्त्वाची औद्योगिक केंद्रे, तसेच हिंजवडी, तळवडे आयटी हब आहेत. याशिवाय देहूगाव, आळंदी ही तीर्थस्थळे, तसेच मोठमोठ्या शैक्षणिक संकुले, दवाखाने आणि बाजारपेठा यामुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड दबाव आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग, बंगळुरू-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग हेही शहरातूनच जात असल्यामुळे वाहतुकीचा भार अधिक वाढतो आहे.
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, मेट्रो मार्गिकांचे सुरू असलेले काम आणि औद्योगिक व आयटी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर होणारी वाहनांची ये-जा यामुळे अनेक भागांत दिवसाच्या ठराविक वेळात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. त्यामुळे पूर्वीपासून लागू असलेल्या अवजड वाहनांवरील वेळबद्ध प्रवेशबंदीची मुदत आता वाढवण्यात आली आहे.
कुठे, केव्हा बंदी?
सर्वसाधारण बंदीचा कालावधी : सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत
लागू भाग : तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, सांगवी, वाकड, बावधन, पिंपरी, देहूरोड, म्हाळुंगेतील ह्युंडाई सर्कल ते खालुंब्रे, तसेच चाकणमार्गे तळेगाव व शिक्रापूर रस्ता
भोसरी वाहतूक विभाग : सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री १०
तळेगाव वाहतूक विभाग : सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ७
पूर्णवेळ बंदी (२४ तास) : तळवडे, दिघी, आळंदी वाहतूक विभागात अवजड वाहनांना दिवसभरासाठी प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
कोणाला सूट?
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, दुधाचे टँकर आणि सैन्य दलाची अवजड वाहने यांना या बंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाहतूक विभागाकडून वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.