पास विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचलनातील तूट गेल्या दहा वर्षांत सात पटीने वाढली आहे. ती ७६६ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी काही उपाय महापालिकेच्या लेखा परीक्षकांनी अहवालात सूचविले आहे. तसेच सेवक वर्गाच्या वेतनावरील खर्च, काही वर्षांपासून तिकीट, पास दरात न झालेली वाढ, तपासणी पथक सक्षम नसणे अशा कारणांमुळे ही तूट वाढत असल्याचे मत मुख्य लेखापरीक्षक जितेंद्र कोळंबे यांनी व्यक्त केले.
पीएमपीएमएलच्या वार्षिक लेख्यांची तपासणी करून मुख्य लेखापरीक्षक कोळंबे यांनी हा अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. पीएमपीएमएलच्या प्रवासी संख्येत वाढ होत असली तरी संचलनातील तूट कमी झाल्याचे दिसून येत नाही. २०१५-१६ या वर्षात पीएमपीएमएलला सुमारे ३०४ कोटी रुपये इतकी संचलनातील तूट होती. याचे प्रमाण ३४.२५ टक्के इतके होते. ते २०२३-२४ या वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यावर्षी ७६६ कोटी ८७ लाख इतकी तूट दिसत असून, तिचे प्रमाण ५९. ५८ टक्के इतके असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मतही अहवालात नोंदविण्यात आले.
का वाढली तूट?
– पीएमपीएमएलला तिकीट विक्री आणि पास विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट
– कोणत्याही प्रकारच्या तिकिट आणि पासच्या दरात वाढ केली गेली नाही
– तपासणी पथक सक्षमपणे काम करत नाही
– बस संचलनात प्रति किलोमीटरसाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्षात प्रति किलोमीटर मिळणारे उत्पन्न यातील तफावत दूर करण्याकडे दुर्लक्ष
– पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळणाऱ्या पासेसच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट
– उत्पादन खर्च, उत्पादित धाव, स्थायी खर्चात कोणतीही बचत न केल्याने तुटीत ६० टक्के वाढ
– सेवकांच्या वेतनावरील खर्चात सातत्याने होणारी वाढ