Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कनेक्टीव्हिटीसाठी 'PMRDA'चा विकास आराखडा; 636 कोटींचा खर्च करण्यात येणार
सासवड/संभाजी महामुनी: पुरंदर मधील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव आदी सात गावांमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या ‘कनेटिव्हिटीला’ प्राधान्य देण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अर्थसंकल्प आणि मेट्रोच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात अनेक पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. त्यामुळे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने जोरदार बांधणी सुरु असल्याचे दिसत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा नुकताच करण्यात आला आहे. त्यासाठी एक लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून या एकात्मिक आराखड्यात पुरंदर विमानतळापर्यंतचा ‘कनेक्ट’ वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपीचे नवे मार्ग, पीएमपीचे टर्मिनल, रेल्वे जोड मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पातही पुरंदर विमान तळापर्यंतची कनेक्टव्हिटी वाढविण्यासाठी जोड रस्ते, काँक्रीट रस्ते, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, बाह्यवळण वर्तुळाकार मार्गाला जोडणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. तब्बल ६३६ कोटीं खर्च येत्या काही वर्षात पीएमआरडीएकडून यासाठी करण्यात येणार आहे.
हेही वाचा: Purandar: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारचे एक पाऊल पुढे; शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?
एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार पुरंदर विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता वार्षिक ८.०१ लाख इतकी असून ३९ हजार ३६९ टन एवढ्या कार्गोची वाहतूक होणार आहे. सध्या प्रस्तावित विमानतळाकडे दोन मार्ग आहेत. त्यामुळे नव्याने काही मार्गात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाच रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या रस्त्यांमध्ये होणार सुधारणा. ,,,,
हडपसर- सासवड दिवे घाट मार्गे जाणारा रस्ता, सासवड ते बोपदेव, उरूळी कांचन-जेजुरी रस्ता, सासवड- कापूरव्होळ- भोर रस्ता आणि खेड- शिवापूर सासवड लिंक रस्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. ही सुधारणा नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावरून विमानतळाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पुरंदर मधील प्रस्तावित विमानतळ परिसरात रस्त्यांचे जाळेही पीएमएआरडीए कडून विस्तारित करण्यात येणार आहे. त्यासाठी ६३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांतर्गत सिमेंट कॉन्क्रेटचे रस्ते राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, बाह्य वर्तुळाकार मार्गाला जोडणारे रस्ते तयार करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. एकूण ६१ किमी लांबीचे रस्ते या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा: Purandar: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारचे एक पाऊल पुढे; शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?
पीएमआरडीए कडून पुढील रस्ते करण्यात येणार आहेत.
रस्त्याचे नाव रस्त्याची लांबी …
उरूळी कांचन ते जेजुरी १५ किलोमीटर, सासवड ते पारगाव चौफुला १०.५० किलोमीटर, बोपदेव घाट रस्ता १९.५० किलोमीटर, खेड शिवापूर ते सासवड १६.०० किलोमीटर, कापूरव्होळ ते सासवड रस्ता कार्यान्वित, दिवेघाट रस्ता रस्ता कार्यान्वित आहे. विशेष म्हणजे यातील अनेक रस्त्यांना पूर्वीच मंजुरी मिळाली असली तरी कामाला गती मिळाली नव्हती. मात्र आता हे रस्ते प्राधान्याने करण्यात येणार आहेत.
‘पीएमपी’चेही जाळे निर्माण करण्यात येणार.
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरण च्या वतीने रस्त्यांची कनेक्टीव्हिटी वाढविण्यात येत असतानाच पीएमपीच्या माध्यमातूनही विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी झेंडेवाडी ते वनपुरी हा मार्ग काळेवाडी मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. सासवड येथील पीएणपीच्या टर्मिनलचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच सात इंटर बस टर्मिलनही सासवड येथे निर्माण करण्यात येणार आहे