पुरंदर विमानतळाला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल (फोटो- istockphoto)
सासवड/संभाजी महामुनी: पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर पर्यंत भूसंपादन करण्याच्या एमआयडीसीला ( महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ) आदेश दिले आहेत. त्याच बरोबर अन्य नियोजनाच्या प्रक्रियाही राबविण्याच्या स्य्चना दिल्या आहेत. साहजिकच इतके दिवस विमानतळ प्रकल्पाचे काय होणार ? या चर्चेवर अखेर पडदा पडला असून येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया वेग घेईल अशी चिन्हे आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होणार असून यासाठी एकूण २८३२ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. माजीमंत्री विजय शिवतारे यांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, विमानतळ प्राधिकरण, संरक्षण मंत्रालय आदींसह सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. प्रकल्पाचा नकाशा तयार करून पूर्ण प्लान तयार करण्यात आला आहे. सरकारच्या उच्चाधिकार समितीने एमआयडीसी अथवा खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी तत्वता मान्यताही दिली होती.
विमानतळ प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने सत्ताबदल होताच राज्य शासनाने जागेतून प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार संजय जगताप यांनी प्रकल्पातील जागेत बदल करून याच परिसराच्या पूर्व भागातील रिसेपिसे, पांडेश्वर, राजुरी, नायगाव तसेच बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवडी, आंबी खुर्द, या भागात प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एकूण ३१०३. ३८ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आमदार संजय जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेवून चर्चाही केली. परंतु लष्कराने आणि संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे पुरंदरच्या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
हेही वाचा: पुरंदर विमानतळ ‘हवेतच’; वर्षभरात केवळ राजकीय चर्चेचीच उड्डाणे
राज्यात सत्तांतर होवून उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा निर्माण झाले. त्यामुळे विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेवून एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला. देवेंद्र फडणवीस यांची या प्रकल्पाला मोठी मदत झाली होती. त्यामुळे शिवतारे यांनी पुरंदरला तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा घेतली. आणि त्याच सभेत एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्याच जागेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
विमानतळ प्रकल्पाबाबत आजी माजी आमदार एकत्र येणार का ?
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे. यासाठी तालुक्याच्या आजी माजी आमदारांनी आपल्यातील इगो बाजूला ठेवावा आणि एकमताने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेजुरी येथील शासन आपल्या दारी या उपक्रमात केले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विमानतळ प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना कोणताही प्रकल्प हवेत होत नाही. त्यासाठी जमीनच लागते. त्यामुळे एकाचा या जागेला विरोध तर दुसऱ्याचा दुसऱ्या जागेला विरोध असे चालणार नाही असे खडसावत विजय शिवतारे आणि आमदार संजय जगताप यानाही अप्रत्यक्षपणे सूचक इशारा दिला होता. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही वेळोवेळा पुरंदरच्या विकासासाठी विमानतळ प्रकल्प आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केवळ जागेवरून श्रेयवाद करणारे पुरंदरचे आजी माजी आमदार विमानतळ प्रकल्पाबाबत एकत्र येणार का ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
हेही वाचा: “विमानतळाचा प्रश्न प्रलंबित ठेवून कागदाचे विमान…”; शिवतारेंची आमदार जगतापांवर जोरदार टीकास्त्र
विमानतळ प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना विश्वासात कधी घेणार ?
पुरंदर मधील बहुचर्चित विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला असून यामुळे लवकरच भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार आहे. वास्तविक पाहता याबाबत कित्येक वर्षे चर्चा आणि आराखडे बांधण्यात येत होते, राजकीय श्रेयवाद सुरु होता. वेगवेगळ्या घोषणा परस्पर जाहीर करण्यात येत होत्या. मात्र आजपर्यंत संबंधित गावातील एकाही शेतकऱ्याला विश्वासात घेतले गेले नाही. अथवा त्यांच्या मागण्या काय आहेत याबाबत एकही शासकीय अधिकारी किंवा राजकीय नेता शेतकऱ्यांशी बोललेला नाही. असे असताना आजही पुन्हा घोषणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात कधी घेणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.