पुरंदर विमानतळ प्रकल्प (फोटो- istockphoto)
सासवड: पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजवडी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर कित्येक वर्षे अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस विरोध वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सरकार कंबर बांधूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच सप्टेंबर पर्यंत जागेचे भूसंपादन करण्याचे आदेश दिल्यानंतर या कामाने प्रचंड वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणे सहज शक्य व्हावे, यासाठी सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वेस्थानकापासून विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत ही कामे केली जातील. तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यान उरुळी कांचनपर्यंत पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देणे नियोजित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शिक्रापूर ते दौंड हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.
हेही वाचा: Purandar Airport: “जबरदस्ती केली तरी …”; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा
पुणे, पिंपरी-चिंचवड, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. या आराखड्याची तीन टप्प्यांत अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण, पीएमपी सक्षमीकरणाबरोबर बीआरटी मार्गांचे जाळे, तसेच रेल्वे मार्गांमध्येही सुधारणा करण्याचे नियोजित आहे. पुणे, शिवाजीनगर, चिंचवड आणि तळेगाव स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजना त्याअंतर्गत राबविण्यात येणार आहेत.
सातारा रेल्वे मार्गावर प्रस्तावित विमानतळाजवळ जेजुरी आणि राजेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत. त्यातील राजेवाडी हे स्थानक विमानतळापासून जवळ आहे. त्यामुळे राजेवाडी ते विमानतळ या दरम्यान रेल्वेचा स्वतंत्र मार्ग (स्पूर लाइन) विकसित करावा लागेल, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना जाणे-येणे सुलभ होईल, असा दावाही करण्यात आला आहे.
पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर बाह्य वळण मार्गाचाही वाहतुकीच्या दृष्टीने योग्य वापर करता येईल, असे या आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पुणे-मिरज मार्गावरील फुरसुंगी स्थानकाचे पॅसेंजर टर्मिनलमध्ये रूपांतर करून ते शिंदवणे येथे स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव आराखड्यात ठेवण्यात आला आहे.
विमानतळाकडे जाण्यासाठी रस्ते मार्गांचीही कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे नियोजित आहे. त्यानुसार दिवे घाटमार्गे हडपसर-सासवड, सासवड-बोपदेव, उरुळी कांचन-जेजुरी रस्ता, सासवड-कापूरव्होळ-भोर रस्ता आणि खेड-शिवापूर सासवड लिंक रस्त्या मध्ये सुधारणा करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. एकूणच विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या दृष्टीने सरकारचे हे निर्णय असल्याचे दिसून येत असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात हालचाली होण्याची शक्यात आहे. आता शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना सरकार कशा पद्धतीने करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.