
ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी केली अटक; सापळा रचून कारवाई
कोल्हापूर : एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या साजन ऊर्फ पाबोलो गुलाब शेख (वय ३१, सध्या रा. क्रांतीसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर. मूळगाव बारामती) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 36 हजार रुपये किंमतीचे ड्रग्ज, मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.
हेदेखील वाचा : ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात त्रास झाल्यास थेट करा तक्रार
तसेच त्याला ड्रग्ज पुरवणारा कुख्यात तस्कर मनीष रामविलास नागोरी (रा. सांगली नाका, इचलकरंजी) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. कळंबा येथील संकल्पसिद्धी हॉलसमोर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबतची माहिती अशी की, इचलकरंजी येथील पिस्तूल तस्कर मनीष नागोरी हा ड्रग्ज व्यवसायात गुंतला असून, त्याने सदरचा ड्रग्ज विक्रीसाठी आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तेव्हा पोलिसांनी कारचालक समीर शेख याला अटक करून चौकशी केली. तेव्हा हा ड्रग्जसाठा इचलकरंजी येथील कुख्यात तस्कर मनीष नागोरी याच्याकडून आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने नागोरी याला अटक केली. दोन्ही संशयितावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
मनीष नागोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार
तस्करीतून पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेला मनीष नागोरी याचे अनेक कारनामे उघड आहेत. इचलकरंजी परिसरात त्याने अवैध व्यवसायाचे साम्राज्य निर्माण केले आहे. त्याच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करीचे रॉकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे. न्यायालयात त्याला हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
हेदेखील वाचा : नंदुरबारमधील अल्पवयीन मुलीवर अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना घेतलं ताब्यात, वाचा संपूर्ण प्रकरण