नंदुरबार : 10 सप्टेंबर रोजी तळोदा येथील 13 वर्षीय अल्पवयीन बालिकाचे अपहरण करून तिचा खून झाल्याची घटना घडली. घटना संवेदनशील असल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीला अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे. सदर पीडित मुलगी तिचे भावासोबत शाळेत जाते असे सांगून घरातून निघुन गेली. दुपारी शाळा सुटल्यावर मुलगा हा एकटाच घरी आला पालकांनी बहिणीबद्दल विचारपूस केली असता मुलाने सांगितले की, ती एक लाल रंगाच्या मोटार सायकलवर बसून कुठे तरी निघुन गेली आहे. त्यावरुन पालकांनी तिचे शाळेत आणि आजु-बाजुच्या परीसरात तिचा शोध घेतला असता अल्पवयीन बालिका मिळून आली नाही. त्यावरुन तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता. 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडलेले असल्याची माहिती तळोदा पोलीसांना मिळाली. तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राजु लोखंडे आणि पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी पोहाचले. त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतली आणि वरीष्ठांना घटनेबाबत माहिती दिली. सदर घटना अतिशय गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोनि श्री. हेमंत पाटील आणि इतर पोलीस अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तळोदा, नंदुरबार शहर, अक्कलकुवा आणि शहादा पोलीस ठाणे सह स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना तात्काळ तपासकामी रवाना केले. 13 सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस पथकाने तात्काळ संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत सविस्तर माहिती दिली. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक. आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी. दर्शन दुगड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक , किरणकुमार खेडकर, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक. राजु लोखंडे, याच्या पथकाने केली आहे.