
Police gave information about how the Navle Bridge accident in Pune happened
Navle Bridge Accident: पुणे : शहरातील यमराज बनलेल्या नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या सामानवाहू ट्रकने अनेक गाड्यांना धडक दिली. या भीषण अपघाताचा (Accident News) ह्रदयद्रावक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेमध्ये दुर्देवाने एका कंटेनर मधून दोन पुरुष व कारमधून दोन पुरुष दोन महिला व एक मुलगी असे एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यानंतर पोलिसांनी (Maharashtra Police) या अपघाताबाबत माहिती दिली आहे.
पुणे नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी देखील झाली. घटनास्थळी पोलीस दल, अग्निशमन दल, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते तर, अनेकजण जखमी आहेत. त्यामध्ये, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र, नवले ब्रीजवरील सेल्फी पाँईटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्याने ह्या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटनेरला धडक दिली. मात्र, त्या कंटनेरच्या अलिकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे. ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते,
पुण्यातील नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा बनला आहे. नवले पुलावर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेकदा या ठिकाणी गाड्यांचे ब्रेक फेल झाल्याने आणि धडकेने भीषण अपघात होत असतात. महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचे मुख्य कारण असून साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे. याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण आहे, तसेच या ठिकाणीच दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात. तेव्हा तीव्र उतार असल्याने अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटतं, समोरच्या वाहनांवर ती अवजड वाहनं जाऊन धडकतात आणि अपघात घडतो. अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, मात्र कोणताही कायमस्वरुपी तोडगा केलेला नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाणून घेण्यासाठी क्लिक करा
सायंकाळी ०५•४० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला आहे अशी वर्दि आली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण 8 अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहचताच पाहिले की, दोन कंटेनर व त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.