
Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; 'ही' यादी जाहीर होणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या याद्या १२ तारखेला आणि त्यानंतर सोमवारी (दि. २४) प्रसिध्द करण्याचे नियोजन होते. मात्र, आता या याद्या बुधवारी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समित्यांचे १४६ गण आदींसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. जिल्हा परिषदेतील सदस्य पदासाठी १३ ऑक्टोंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
तसेच, याच दिवशी जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे, पुरंदर, शिरूर, मावळ, हवेली, दौंड, भोर, बारामती, इंदापूर येथे तालुकानिहाय पंचायत समितीची आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा या सोडतीनुसार निश्चित करण्यात आल्या. त्याबाबत हरकती घेण्यासाठी १७ ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिलेली होती.
Local Body Election: चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली? ‘उबाठा’त दुफळी; निवडणुकीत काय होणार?
या मुदतीमध्ये जिल्हा परिषदेतील ७३ गटासाठी १७ हरकती तर, पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ४ हरकती प्राप्त झाल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रारुप आरक्षणाबाबत प्राप्त हरकतींच्या आधारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे अभिप्राय सादर केला. हा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून ३१ ऑक्टोंबरला आरक्षण अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात आली.