
जंतराव ढापलेला साखर कारखाना परत द्या; जतमध्ये व्यंगचित्रात्मक पोस्टरबाजीने खळबळ
जत : जत शहरात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्रात्मक डिजिटल फलक लावल्याने खळबळ उडाली असून, उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. साखर कारखान्याच्या मुद्यावरून शहरातील प्रमुख चौकात रात्री अज्ञातांकडून हे पोस्टर लावण्यात आले होते. रविवारी रात्री लावण्यात आलेल्या पोस्टरवर जंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत त्या बरं का..? असा मजकूर लिहिला होता. परंतु जत पोलिस प्रशासन व पालिका प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पहाटेच्या सुमारास लावलेले पोस्टर काढले.
जत शहरात अलीकडील काही दिवसात पोस्टरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जतमधील राजारामबापू साखर कारखान्यावरील नाव बदलण्यात आले होते. तर सोमवारी रात्री आमदार गोपीचंद पडळकर यांचे पोस्टर अज्ञातांकडून फाडण्यात आले. या विरोधात पडळकर समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री अज्ञातांकडून जयंत पाटील यांच्या विरोधात पोस्टरबाजी केल्याने जतच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
तुम्ही काय विकासकामे केली?
लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का..? तुम्ही जतमध्ये आज पर्यंत काय विकासकामे केली. उलट सभासदांचा कष्टाचा कारखाना ढापला. या सर्व प्रकारामुळे जतचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
जत तालुका अशांत ठेवण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळीकडून सुरू आहे. अशा पोस्टरबाजी व स्टंटबाजीमुळे जनतेचे भले होणार नाही, तर जनतेच्या भल्यासाठी काम करा. जयंत पाटील यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. या प्रकाराचे कोणीही भांडवल करू नये. – मन्सूर खतीब, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट)