प्रशांत कोरटकरला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 1 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. ऱविवारी झालेल्या सुनावणीला दोन्हीकडील वकील ऑनलाईन पद्धतीने हजर होते. तर पोलिसांनी सतर्कता म्हणून कोरटकरलाही न्यायालयात ऑनलाईन हजर केले होते.
दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर प्रशांत कोरटकरला ऑनलाईन हजर करण्यात आले. न्यायालयाने कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, अजूनही कोरटकरला मदत करणाऱ्या साथीदारांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झालेली आहेत. न्यायालयासमोर सरकारी वकील आणि पोलिसांचे म्हणणं मांडणे आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. आता जामीन अर्जावर 1 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने कोरटकरची यातून सुटका होते का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी दोन वेळा प्रत्यक्ष हजर करताना कोरटकरवर शिवभक्तांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगत प्रशांत कोरटकरला ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर केलं होते.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरला तातडीने कळंबा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. जामीन अर्जावर एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहात असणार आहे. या ठिकाणीही पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.