कोरटकरची पाच तास कसून चौकशी सावंतांना फोन केल्याची कबुली
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अन्यत्र हलवण्यात आले आहे. बुधवारी त्याची रवानगी राजाराम पोलीस ठाण्यात केली होती. फॉरेन्सिक टीमकडून कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. दरम्यान, तपासासाठी त्याला अन्यत्र हलवण्यात आले आहे. त्याला सध्या कुठे नेण्यात आले आहे
याबाबत पोलीस प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. याबाबतची काहीही माहिती दिली जात नाही. दरम्यान, काल दिवसभर पोलिसांकडून कोरटकर याची कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्याने इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला असून मोबाईलमधील डाटा देखील स्वतः डिलीट केल्याची कबुली दिली आहे.
कोरटकरचा तपास होत असताना ज्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आम्हास मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाण्याची शक्यता आहे. असे त्यांनी म्हटले आहे. याचा तपास निपक्षपाती तसेच कुठलाही दबावाला बळी न पडता पोलिसांनी करावा अशी मागणी शिवप्रेमीनी केली आहे.
यापूर्वी इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही प्रशांत कोरटकर हे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कोरटकर यांनी त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटा डिलीट केल्याचा आरोप सरोदे यांनी केला होता. याशिवाय, गेल्या १५ दिवसांपासून पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत होते. तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता. असे असूनही, प्रशांत कोरटकर कोलकातासारख्या प्रमुख विमानतळावरून व्हिसाचा वापर करून दुबईला सहज प्रवास करेल, असे अनेकांना वाटले नव्हते. त्यानंतर आता त्याची अटक झाली आहे.