मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणात मोका अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मिरा-भाईंदर शहरातील हटकेश परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ड्रग्स तस्करीच्या प्रकरणाने चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. या गंभीर प्रकारावर तातडीने लक्ष घालत राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असून, ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ‘ड्रग्समुक्त मिरा-भाईंदर’ या विशेष मोहिमेचीही घोषणा केली आहे.
हटकेश भागातील नागरिकांनी जागरूकता दाखवत काही तरुण ड्रग्स विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांकडे सोपवले होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, काशीगाव पोलिसांनी केवळ दोन तासांत कोणतीही ठोस कारवाई न करता या आरोपींना सोडून दिले. स्थानिक वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनंतर ही बाब उजेडात आली. त्यामुळे पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे.
ही घटना हटकेश भागातील ‘माफिया क्लब’जवळ घडली होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडले गेले होते, परंतु त्यांना लगेचच सोडून दिले गेले. यावरून काही पोलिस आणि ड्रग्स माफियांमधील साठेलोटे संबंधाचा संशय बळावतो आहे. याबाबत मंत्री सरनाईक यांनी नवीन पोलीस आयुक्त नितीन कौशिक यांच्याशी थेट संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
मंत्री सरनाईक म्हणाले, “मिरा-भाईंदर हे शांतताप्रिय आणि प्रगतिशील शहर आहे. येथे जर खुलेआम ड्रग्सची तस्करी होत असेल, तर तीव्र स्वरूपात कारवाई होणे अत्यावश्यक आहे. ‘मोका’ अंतर्गत कठोर पावले उचलण्यात येतील. केवळ गुन्हेगारच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवरही कारवाई होणार आहे.”
शिवरायांचे 12 किल्ले UNESCO च्या वारसा यादीत, पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,”मी सर्वांना आवाहन करतो की…
नवीन पोलीस आयुक्त नितीन कौशिक यांना उद्देशून सरनाईक म्हणाले, “तुमच्या कार्यकाळात ड्रग्स रॅकेट पूर्णतः नष्ट व्हावे अशी अपेक्षा आहे. तरुण पिढीचं रक्षण करणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे.”
सरनाईक यांनी शहरात ‘ड्रग्समुक्त मिरा-भाईंदर’ मोहिमेची घोषणा करत नागरिकांचा सहभाग आणि पोलिसांची जबाबदारी या दोन्ही बाबी स्पष्ट केल्या. “तरुण पिढीचा अधःपात करणाऱ्या या ड्रग माफियांना कोणतीही माफी नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
या तातडीच्या कारवाईनंतर शहरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. अनेकांनी मंत्री सरनाईक यांच्या ठोस पावलं आणि पोलिस यंत्रणेला दिलेल्या स्पष्ट सूचनांचे स्वागत केले आहे. आता पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे की, केवळ ड्रग माफियांवरच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणांवरही कठोर कारवाई केली जाईल.