प्रवीण माने करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
इंदापूर : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने हे शनिवारी (दि.३) राष्ट्रवादी काँग्रेस. शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यात उद्या शनिवारी आमदार रोहित पवार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवीण माने पक्षप्रवेश करणार आहेत. याची माहिती तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.
प्रवीण माने यांचे इंदापूर तालुक्यातील राजकारणात व समाजकारणात ते अग्रेसर आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यात भरीव निधी देऊन अनेक विकासात्मक कामे केली आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात राहण्यात धन्यता मानली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रणसिंग फुंकून खेडोपाडी जाऊन प्रचार केला होता. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.त्यानंतर माने यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या पक्षाचा उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते.माने यांच्या या अकल्पित निर्णयानंतर त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला गेला असल्याची चर्चा अद्याप पर्यंत रंगत आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांचे चिरंजीव आहेत.सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवक, महिला – पुरुषांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यात माने परिवाराचे योगदान आहे.ऑगस्ट महिन्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानकडून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.त्यामुळे माने यांच्या या पक्षप्रवेशामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यातुन मोठा धक्का मानला जात आहे.