अवकाळीत पाटण तालुक्यात ७४ घरे व १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले असून, गेल्या तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. कासेगांव, तनाळी, सिध्देवाडी, तावशी आणि शहर तालुक्याचा काही भाग येथे मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला.
पारनेर तालुक्यातील सुपा, वाडेगव्हाण, पळवे, निघोज या परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. शेतजमीन आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत होऊन अनेक गावे अंधारात बुडाली. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या तर काही ठिकाणी विजेचा खांब वाकले आहेत. त्यामुळे अनेक भागात 6-7 तास वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, अनेक गावांना वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. पावसाळ्यापूर्वीच महावितरणकडून दरवर्षी दुरुस्ती मोहिम राबवली जाते. तारांजवळील झाडे तोडली जातात. कमकुवत तारा बदलल्या जातात. नादुरुस्त पोल दुरुस्त करुन त्यांना ताण दिले जातात. मात्र, यंदा अशी कामे महावितरणकडून बहुतांश भागात झालेली नाहीत. त्यामुळे अनेक गावे अंधारात बुडाली.
पुणे शहरात मंगळवारी दुपारी पाऊस
पुणे शहरात मंगळवारी दुपारी पाऊस सुरू झाला. रात्री आठनंतर पावसाचा जोर वाढला. वादळी वारे तसेच जोरदर पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच, फ्लेक्स पडल्याच्या तीन घटना देखील उपनगरांमध्ये घडल्या. त्यासोबतच रस्त्यांवर पाणी साचल्याचे व काही सोसायट्यांमध्येही पाणी साचले गेले होते.