राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार कोल्हापूर दौरा
कोल्हापूर : राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नियोजित दौरा असणार आहे. येत्या रविवारी 28 जुलै रोजी द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. त्यांचा हा दौरा कौल्हापूरमध्ये असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलीस अधीक्षक महेंद्र उपस्थित होते. राष्ट्रपतींचे आगमन, दौरा आणि सुरक्षा याबाबत काळजी घेतली जात आहे.
येत्या 28 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सकाळी कोल्हापूरमध्ये करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. देवीचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती पुढे वारणेला जाणार आहेत. या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. वारणा येथे नव्याने मान्यता मिळालेल्या वारणा विद्यापीठाच्या उद्दघाटनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.
सकाळी कोल्हापूर विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. त्यानंतर देवीचे दर्शन घेणार आहेत. दुपारचे राष्ट्रपतींचे जेवण शासकीय निवासस्थानी होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या लोकार्पण कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता विमानाने त्या दिल्लीकडे रवाना होणार आहेत. असा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा कार्यक्रम असणार आहे.