
या रस्त्यावर शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, बाजारपेठांमधले व्यावसायिक, काम करणारे कामगार त्याचबरोबर चांदोली पर्यटनासाठी आलेले पर्यटक, पुण्या-मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसेस, बगॅस व ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने अशा सर्वांची मोठी वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून कासवापेक्षाही धीम्या गतीने सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याची खुदई केली आहे, तर काही ठिकाणी भराव टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्त्यात पडलेली खडी
विखुरलेली आहे.
दालमिया कारखान्यानजीक दोन्ही बाजूच्या काँक्रिट रस्त्यांच्या मधोमध मोठे चढ-उतार आहेत. अपघातांना आयतेच निमंत्रण देतील इतके मोठे खड्डे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.नागरिकांचे आरोग्य धोक्यात; दुरवस्थेमुळे रस्त्यावर धुळीचे लोट रस्त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे वाहनांचा अक्षरशः खुळखुळा होत आहे. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर धुळीचे लोट पसरत आहेत. या धुळीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. संबंधित विभागाने यात तातडीने लक्ष घालावे व ठेकेदार कंपनीकडून लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे, अशा भावना वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.