
शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
शिराळा : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वगळून भाजप, शिवसेना व मित्र पक्षाकडून शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक हे उमेदवार असतील असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिराळा येथे भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ॲड भगतसिंग नाईक,शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी, विश्वप्रपसिंह नाईक, यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील नगरपंचायतवर भगवा फडकेल आणि जागा वाटपाबाबत दोन दिवसात स्थानिक पातळीवर उमेदवारी ठरवली जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
आमदार देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा होऊन नगराध्यक्षपदी पृथ्वीसिंग नाईक यांचे नाव निश्चित झाले आहे. विरोधकांनी खालच्या पातळीवर षडयंत्र रचले आहेत. स्वतःच्या पक्षाचे चिन्ह खुंटीला टांगले आहे. या विरोधकांचा संधिसाधूपणास मतदारच उत्तर देतील. आमच्या युतीतील घटक पक्षाशी बोलणी व सामन्यव चांगला आहे. वरिष्ठांचा सन्मान व विनंतीचा मान राखून शिवसेना शिंदे गटाच्या पृथ्वीसिंग नाईक यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत आम्ही एकत्रित एकदिलाने यश संपादन करू असे देशमुख यांनी सांगीतले.
यावेळी सुखदेव पाटील, संपतराव देशमुख, नंदकुमार नीळकंठ, के. डी. पाटील, विक्रम पाटील, विनायक गायकवाड, निलेश आवटे, स्वप्नील निकम, सम्राट शिंदे आदी उपस्थित होते.