टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीच्या माळावर असणाऱ्या एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त खव्याचे उत्पादन सुरू असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पुणे व येरमाळसह राज्यातील विविध भागात हा भेसळ खवा पोहोचवला जात असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हा खवा बनविणाऱ्या स्थानिक व्यवसायिकाने गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून त्यापासून इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा धंदा उभारला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शुद्ध खवा तयार करण्यासाठी १ किलोसाठी साधारणपणे पाच लिटर दुधाची गरज भासते. याचा खर्च सरासरी २२५ ते २५० रुपयांच्या दरम्यान येतो. मात्र, टाकळीवाडीच्या गोडाऊनमधून बाहेर पडणारा खवा अत्यल्प दराने बाजारात विक्रीस येत असल्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर संशय निर्माण झाला आहे. इतक्या कमी किमतीत खवा विक्रीला उपलब्ध होत आहे. यामागे नक्कीच भेसळ आहे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी भेसळयुक्त खवा तयार होत असल्याची माहिती गावात पसरली असून, त्यामुळे टाकळीवाडी व आसपासच्या परिसरात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे अन्न-औषध प्रशासनाची भूमिका धास्तावणारी ठरत आहे.
प्रशासनाविरोधात आंदोलन छेडणार
भेसळीचा प्रकार समोर येऊनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गोडाऊनवर छापा टाकून भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली नाही तर प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कारवाई न केल्यास उपोषण करणार
यासंदर्भात लवकरच निवेदन देऊन भेसळखोरांना जाब विचारण्यात येणार असून, कारवाई टाळली गेल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. भेसळयुक्त खवा हा केवळ आरोग्यासाठी हानिकारक नसून, दुग्धव्यवसायावरही गालबोट लावणारा ठरत असल्याने या प्रकारावर तातडीने अंकुश आणणे अत्यावश्यक आहे, असा सूर नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांतून उमटत आहे.