
Jejuri Palkhi Accident, Saswad, Warkari, Devendra Fadnavis,
Jejuri Accident : सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर येथील टोलनाका जवळ एका भरधाव ट्रकने वारीत पायी चालत असलेल्या महिलांना जोरदार धडक दिली. यामध्ये तब्बल तीन महिला वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आणखी तीन ते चार महिला वारकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान प्रशासनाच्या ढोंगी कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून त्याच्या हलगर्जीपणामुळेच महिलांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे या घटनेबाबत राज्य शासन नेमकी कोणती भूमिका घेणार ? याकडे राज्यातील लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मधील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून जेजुरीकडे जात असताना जेजुरी जवळील बेलसर फाटा येथे एक ट्रक वारीत घुसला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. ज्या ठिकाणी टाळ मृदुंगाचा जयघोष आणि विठ्ठल नामाचा गजर सुरु होता त्या ठिकाणी अवघ्या काही सेकंदात आक्रोश सुरु झाला. कुणाला काही कळायच्या आत तब्बल तीन जणांचा बळी गेले. माउलींच्या स्वागतासाठी अवघी जेजुरी हातात भंडारा घेवून थांबली असताना सर्वांच्या कानावर अपघाताची दुखद घटना पडली. आणि अपघात कसा घडला याचीच संपूर्ण राज्यात चर्चा सुरु झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने जेजुरीला धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली तसेच प्रशासनाला सूचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत व्यक्तींना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देवून अपघात प्रकरणावरून शासनाला जबाबदार धरले आहे. दरम्यान अपघातावरून आता सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु होईल, मात्र गेलेले जीव परत येणार का ? असा प्रश्न वारकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.
वारकर्यांना सर्व प्रकारची सुरक्षा दिली जाईल, सर्व सुविधा दिली जाईल असे शासनाने अनेकवेळा जाहीर केले. मात्र वारी सुरु झाल्यापासून अधिकाऱ्यांना शासनाच्या घोषणांचा विसर झाला असल्याचे वेळोवेळा दिसून आले आहे. वडकी मधून पालखी सोहळ्याचे प्रस्थान सुरु झाल्यानंतर संपूर्ण दिवे घाट पार करून सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान पुरंदर तालुक्यात आगमन होत असते. परंतु प्रशासनाने यंदाची वारी गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल केवळ ग्रामीण हद्दीतील घाटात येवून थांबले आणि वारीची वाट पाहत राहिले. ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण घाटात पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला दिसून आला. परिणामी पालखी सोहळ्यास पुरंदर मध्ये येण्यास रात्रीचे तब्बल आठ वाजले
पालखी सोहळा सासवडला पोहोचण्यास रात्री ११ वाजले होते. त्यामुळेच सासवडला सोहळा येताच संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुखांनी शासनाचा टाळ वाजवून जोरदार निषेध केला होता. यानंतरही दोन दिवसांच्या मुक्कामात फारसा बदल झाला नाही. संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून येत होते. अनेक पोलीस कर्मचारी असे होते कि, त्यांना बंदोबस्तासाठी कोणते ठिकाण दिला आहे हेही माहित नव्हते, कोणाला तरी विचारून ठिकाणाची खात्री करून घ्यायची आणि एकत्रित येवून मोबाईल मध्ये सेल्फी फोटो घेवून निघून जात होते. त्यामुळे पोलीस प्रशासन किती गंभीर आहे याचा पदोपदी प्रत्यय येत होता.
सासवड वरून जेजुरीकडे सोहळा निघाल्यानंतर तीच परिस्थिती अनुभवास आली. गाड्यांना कोणतेही नियंत्रण नसल्यानेच एवढा मोठा अपघात झाला. वास्तविक पाहता लाखो लोकांचा जनसमुदाय एका रस्त्याने येणार म्हंटल्यावर सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक होते, मात्र येथेही गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच संपूर्ण ट्रक वारीत घुसला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आता वाहतुकीकडे दुर्लक्ष करून आपल्याच मस्तीत असलेल्या सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार ? असा प्रश्न सोहळा प्रमुखांनी उपस्थित केला आहे.