उत्पन्न वाढीसाठी पुणे महापालिका 'अॅक्शन मोड'वर; मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता 'टार्गेट'
पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता ‘टार्गेट’ दिले जाणार आहे. वापरात केलेला बदल, थकबाकी असलेले मिळकतदार, नवीन मिळकतींवरील कर आकारणी करणे अशा विविध कामांसाठी हे ‘टार्गेट’ असेल. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह कर आकारणी व संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी बाणेर भागात संयुक्त पाहणी केली होती.
या संयुक्त पाहणीत काही हॉटेलचालकांकडून पुढील मोकळ्या जागेत शेड, मांडव टाकून व्यवसाय केला जात आहे. इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे, निवासी जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधिक मिळकत कर निरीक्षकांना संपूर्ण पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर होत आहे. त्याची पाहणी करून तेथे वाढीव दराने मिळकत कर आकारणी सुरु करावी, असे आदेश दिले आहेत. अशाप्रकारे सातत्याने अतिरिक्त आयुक्त स्तरावर ‘सरप्राईज व्हिजिट’ करून काय कार्यवाही केली याचा आढावा घेतला जाणार आहे.
हेदेखील वाचा : Vadgaon Maval: मावळमधील 103 ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर; तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतीवर महिलाराज
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज बी. पी. यांनी मिळकत कराचे उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याची माहिती दिली. महापालिकेकडे आजपर्यंत सुमारे चौदाशे कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. तुलनेत यात वाढ दिसणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.
मिळकत कर विभागाला 70 जणांचे मनुष्यबळ
मिळकत कर विभागाला 70 जणांचे मनुष्यबळ मिळाले आहे. यांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिळकत कर निरीक्षकांना एका महिन्याला ठराविक ‘टार्गेट’ निश्चित करून दिले जाणार आहे. त्यांनी दर महिन्याला नवीन मिळकतीवर कर आकारणीसाठी नोंदणी करणे, मिळकतींच्या वापरात झालेल्या बदलानंतर नव्याने कर आकारणी करणे, तसेच अनधिकृतपणे वापर होणाऱ्या ठिकाणी कारवाई करून वाढीव कर आकारणी करणे, थकबाकीदारांकडून कर वसुली करणे याचे ‘टार्गेट’ ठरविले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Pune Market Scam News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा; पणन संचालकांचे चौकशीचे आदेश