पुणे महापालिका आयुक्त अॅक्शन माेडवर, सहायक आयुक्तांंची तातडीने केली बदली; नेमकं कारण काय?
पुणे : पुणे महापालिका आयुक्त नवल किशाेर राम हे ‘अॅक्शन’ माेडवर आले आहेत. शेवाळवाडी, मांजरी भागात पाहणी केल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण आदी समस्यांमुळे त्यांनी थेट सहायक आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले. तसेच तिघांवर निलंबनाची कारवाई केली.
महापालिका आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नवल किशाेर राम यांनी सातत्याने स्वच्छतेविषयी लक्ष दिले आहे. शनिवारी त्यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या शेवाळवाडी, मांजरी या गावांना भेट दिली. येथील व्यवस्थेविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकारी, कर्मचारी, आराेग्य निरीक्षकांवर कारवाई केली.
दाेन दिवसांपुर्वी केली हाेती कारवाई
दोन दिवसांपूर्वी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाघोली भागात झालेल्या पाहणीदरम्यानही आयुक्तांनी ड्रेनेज व अतिक्रमण समस्यांबाबत निष्क्रियतेसाठी शितल वाकडे, सहाय्यक आयुक्त, नगर रोड व ड्रेनेज विभागातील उप अभियंता विनायक शिंदे व गणेश पुरम या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.
शनिवारी आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर पुणे ते सोलापूर महामार्गावरील दुभाजकांमधील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. या भागात अस्वच्छता आढळून आली, तसेच अतिक्रमणे, नाल्यातून वाहणारे सांडपाणी आदी विषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विभागांना स्वच्छता सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. भेटीदरम्यान संबंधित विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे आयुक्तांनी अकार्यक्षम व कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
यांच्यावर झाली कारवाई
हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली केली असुन, त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता रवि खंदारे यांची नियुक्तीचे आदेश तातडीने देण्यात आले. मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम या तिघांवर समाधानकारक काम न केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
“शहरातील अस्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज आणि अतिक्रमणाच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी, निलंबन तसेच अकार्यकारी पदावर बदलीची कारवाई करण्यात येईल.” – नवल किशाेर राम (आयुक्त, महापालिका)