गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; आठ हजार कर्मचारी असणार तैनात
पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुकीची लगभग सुरू झाली असून, ती सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल ८ हजार पोलिस तैनात ठेवले आहेत. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे,’ असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुण्यातील गणरायाची विसर्जन मिरवणूक ही आकर्षणाचे केंद्र बिंदू असते. लाखो भाविक यासाठी पुण्यात दाखल होतात. मोठी गर्दी होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. ’विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. यंदा प्रथमच मंडळांचे जिओ मॅपिंग केले असून, प्रत्येक मंडळासोबत एक नोडल अधिकारी देण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूक वेळेत पुर्ण होईल, असे मानले जात आहे.
जिओ मॅपिंग व नोडल अधिकारी
पुणे पोलिसांनी प्रथमच मंडळांचे जिओ मॅपिंग केले आहे. विसर्जन मिरवणूकीत कुमठेकर, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता व टिळक रस्त्यावरील प्रत्येक मंडळासोबत एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे नोडल अधिकारी दोन मंडळात अंतर पडू देणार नाहीत. तसेच, त्यांच्याशी समन्वय राखणार आहेत. जिओ मॅपिंगमुळे बसल्या ठिकाणी पोलिसांना नेमके मंडळ कोणत्या ठिकाणी आहे, ते का थांबले आहे, याची माहिती मिळणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवरद्वारे लक्ष
विसर्जन मिरवणुकीत ८ हजार पोलिसांसोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मदत केंद्रे, वॉच टॉवर आणि चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभारले जात आहेत. सोनसाखळी चोरी, खिसेकापू किंवा जबरी चोरी यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके असणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिणी पथके असणार आहेत. यावेळी लेझर लाईट्स किंवा घातक दिव्यांचा वापर करण्यास मनाई केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी मदत केंद्रे उभारली जाणार असून, वैद्यकीय मदतीसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे.
पुण्याची विसर्जन मिरवणूक ही परंपरेचा वारसा आहे. नागरिकांचा उत्साह अबाधित राहावा आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सज्ज आहे. सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून शिस्त राखावी.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.
असा असणार बंदोबस्त
अप्पर पोलीस आयुक्त – ४
पोलीस उपायुक्त – १२
सहायक पोलीस आयुक्त – ३३
पोलीस निरीक्षक – १४१
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक – ५५८
कर्मचारी – ६४४३
होमगार्ड – ९७२