
पुणे गणेशोत्सव 2026
डब्लू एस बेकर्सच्या वतीने २५१ किलोचा रसमलाई फ्लेवरचा भव्य मोदक केक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला. डब्लू एस बेकर्सचे संचालक विकास अग्रवाल यावेळी उपस्थित होते. हा केक साकारण्यासाठी ४० ते ५० कलाकारांच्या टीमने परिश्रम घेतले असून, सलग दुसऱ्या वर्षी बेकर्सतर्फे असा अनोखा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.
दुसरीकडे, प्रभात फरसाण व दीपक केटरर्सच्या वतीने दीपक प्रभुदास मालाणी आणि निखिल प्रभुदास मालाणी यांनी भव्य मोतीचूर लाडूचा नैवेद्य अर्पण केला. हा लाडू अत्यंत वजनदार असल्याने तो मंडपात आणण्यासाठी ‘फोर्कलिफ्ट’ वाहनाची मदत घ्यावी लागली. मालाणी परिवाराने गेल्या २६ वर्षांपासून ही परंपरा जपली असून, ५ किलोच्या लाडूपासून सुरू झालेला हा उपक्रम आज अवाढव्य स्वरूपात पाहायला मिळत आहे. आरती आणि नैवेद्य दाखवल्यानंतर हा महाप्रसाद उपस्थित हजारो गणेशभक्तांना वाटण्यात आला. या सोहळ्यास ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धेला धर्माच्या सीमा नसतात, याचा प्रत्यय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीच्या उत्सवात पुन्हा एकदा येत आहे. गणरायाच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित विशेष अलंकार गणेशभक्त समर शेख यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. उत्सवाच्या १३४ वर्षांच्या इतिहासात ‘एकदंत’ रूपासाठी प्रथमच विशेष अलंकार तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
‘अल रझा जेम्स अँड ज्वेल्स’चे प्रोप्रायटर समर शेख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अलंकाराला ‘सिम्बॉल ऑफ ऑनर’ असे नाव देण्यात आले आहे. एकता, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा हा अलंकार बाप्पाच्या एकदंत रूपाला समर्पित करण्यात आला आहे.हा अलंकार तयार करण्यासाठी पाच कारागिरांनी तब्बल दोन महिने मेहनत घेतली.
अलंकारामध्ये एकूण ९.६९ कॅरेट वजनाचे ५५ हिरे जडविण्यात आले आहेत. या दागिन्याची बाजारातील अंदाजे किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याची माहिती समर शेख यांनी दिली.बाप्पाची सेवा करण्याची आणि त्यांच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित अलंकार तयार करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना शेख यांनी व्यक्त केली. शेख कुटुंबीयांच्या वतीने साकारण्यात आलेला हा अलंकार हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक म्हणून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.