सासवड : धावत्या कारवर बाभळीचे भलं मोठं झाड कोसळले. ही घटना सासवड-कात्रज या हिवरे व चांबळी या गावाच्या मध्यभागी घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इनोव्हा कारवर भले मोठे बाभळाचे झाड पडले. ज्यावेळी हे झाड पडले, त्यावेळी ही गाडी या मार्गावरुन प्रवास करत होती.
रविवार असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जेजुरी-मोरगाव नारायणपूर वीर येथे देवदर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला होता. हे वाहन अकलूज येथील असून, या वाहनातील अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी सासवड येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात तिघांना गंभीर मार लागला असल्याचे सांगितले जात आहे.
सासवड-कात्रज या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली असून, स्थानिक नागरिक आपल्या शेतातील भाजीपाला विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसत असतात. एक तर रस्ता अरुंद, त्या भाजी खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करुन वाहनचालक माल खरेदी करतात. यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






