(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Gaurav Khanna:घरात कोणतीही अडचण आली की अनेक पुरुषांकडून एकच उत्तर ऐकायला मिळतं, ते म्हणजे, “मी सांभाळून घेईन.” कुटुंबाच्या आनंदासाठी सतत धडपडणाऱ्या अशाच पुरुषांच्या मनातील भावना अभिनेता गौरव खन्नाने मांडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त गौरवने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून पुरुषांना स्वतःच्या स्वप्नांबद्दल विचार करण्यास भाग पाडणारा भावूक संदेश दिला आहे.
स्टार प्लसच्या आगामी ‘दिल की बेवफाइयाँ’ या मालिकेच्या खास व्हिडीओमध्ये गौरव खन्ना त्याच्या ‘मानव’ या पात्राच्या माध्यमातून संवाद साधताना दिसत आहे. चाळीशी पार केलेल्या मानवला घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडी आणि इच्छा माहीत आहेत. मात्र, स्वतःच्या बकेट लिस्टचा विषय निघतो, तेव्हा त्याला शेवटचं स्वतःच्या मनासारखं काय केलं होतं, हेही आठवावं लागतं.
मानव एकाच दिवसात अनेक भूमिका पार पाडत असतो. मुलगा म्हणून आई-वडिलांची औषधे आणण्यापासून ते पती म्हणून पत्नीच्या करिअरला साथ देण्यापर्यंत, तर मुलांच्या अॅडमिशनपासून कुटुंबाच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यापर्यंत प्रत्येक जबाबदारी तो पार पाडतो. आपल्या माणसांसाठी हे सर्व करताना त्याला आनंदही मिळतो. त्याच्या म्हणण्यानुसार, “त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच आपले स्वप्न बनून जाते.”
मात्र, या सगळ्या धावपळीत स्वतःच्या इच्छांचं काय झालं, याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळच उरत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानव नेहमीच खंबीरपणे उभा राहिला. पण जेव्हा स्वतःच्या इच्छांची वेळ आली, तेव्हा त्याने त्या पुढच्या वेळेसाठी पुढे ढकलल्या. आता आयुष्याच्या या टप्प्यावर त्याला स्वतःची बकेट लिस्ट अजूनही अपूर्ण असल्याची जाणीव होते.
२० वर्षांच्या संसारानंतर मानव आणि जानकीच्या नात्यात नवं वळण?
एकता कपूरच्या ‘दिल की बेवफाइयाँ’ या आगामी कौटुंबिक मालिकेत मानवच्या आयुष्यातील हाच भावनिक संघर्ष पाहायला मिळणार आहे. या मालिकेत गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दोघेही लग्नाला २० वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
जानकीला दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. दोघांनी मिळून उभारलेलं आयुष्य तिच्यासाठी पुरेसं आहे. मानवाचंही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. मात्र, त्याच्या मनात स्वतःच्या अपूर्ण इच्छांची एक खंत कायम आहे. लग्नाच्या २० वर्षांनंतर मानवच्या मनातील ही खंत त्यांच्या नात्यावर काय परिणाम करणार, हे मालिकेत पाहायला मिळेल.
‘दिल की बेवफाइयाँ’ ही मालिका येत्या २४ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर ही मालिका पाहता येईल. गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या यांची नवी जोडी तसेच एका मध्यमवयीन जोडप्याच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत






