
'मतदार राजा जागा हो'चा अखंड जागर; अवलिया करतोय नागरिकांना मतदानाचे आवाहन
अंगावर घोषणांनी रंगवलेले कपडे, गाडी, हेल्मेट, झेंडा, आणि “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो”, “मतदान हे महान कर्तव्य” अशा संदेशांसह बापूराव गेल्या ४० वर्षांपासून अखंड लोकजागृती करत आहेत. कपड्याचा व्यवसाय करणारे बापूराव शिक्षणाने फारसे पुढे गेले नसले तरी, लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व या विषयांमध्ये त्यांचा विश्वास अत्यंत ठाम आहे. “माझ्या एका मताने काय फरक पडणार?” किंवा “निवडून आले की सगळे सारखेच वागतात” अशा निराशावादाला बापूराव यांनी नवीन प्रचार पद्धत दिली. सरळ चालण्याऐवजी उलट पायी चालत जनजागृती करणे. त्यांनी पुणे ते दिल्ली, तुळजापूर ते वैष्णोदेवी, आळंदी ते पंढरपूर अशा अनेक मार्ग उलट पायी चालून लोकशाहीचा संदेश पोहोचवला आहे.
बापूराव यांचा उद्देश निवडणुकीत फक्त प्रकाशझोतात येणे नाही, तर लोकशाही टिकून राहावी यासाठी वर्षभर प्रचार करणे हा आहे. त्यांनी सामाजिक विषयांवर आधारित सहा पुस्तके लिहिली आहेत. बापूराव गुंड यांच्या मते, “निवडणुका केवळ घातपात किंवा रक्तपातासाठी नाहीत. योग्य उमेदवार नसेल तर ‘नोटा’चा पर्याय आहे, पण मतदान न करणे हा उपाय नाही. मतदार राजा वेळेवर जागा झाला, तरच लोकशाहीचा धागा मजबूत राहील.”
हे सुद्धा वाचा : आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले महत्वाचे आवाहन
पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ
पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून, बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे.