
विद्युत तारेच्या झटक्याने तरूण गंभीर जखमी; महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका
पिंपरी : वीज महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार नौदलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या तरूणाच्या जीवावर बेतला आहे. घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या १७ वर्षीय तरूणाला गच्चीलगतच्या उच्च विद्युत वाहक तारेचा शॉक बसला. यात पाय, हात, पोट आणि पाठीला गंभीर भाजल्याने तरूणाचे नौदलात जाण्याचे स्वप्न भंग पावले आहे. दुसरीकडे या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतरही हातावर पोट असणार्या या कुटूंबाला आर्थिक मदत करण्यास महावितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे.
अनिरुद्ध प्रशांत पाटील (वय १७, रा. एंजल स्कुलजवळ, चर्होली खुर्द) असे शॉक बसून गंभीर भाजलेल्या तरूणाचे नाव आहे. अनिरूद्ध हा बारावीच्या वर्गात शिकत आहे. नौदलात जाण्याचे त्याचे स्वप्न असून त्यादृष्टीने त्याची तयारी सुरू होती. याशिवाय तायक्वांदो या कराटे प्रकारातही तो पारंगत आहे. त्याचे वडील प्रशात हे इलेक्ट्रीशियनचे काम करतात. तर, आई अर्चना खासगी संस्थेत अकाऊंटट म्हणून नोकरी करते. पाटील कुटूंबियांनी चर्होलीत जागा खरेदी करून २०१८ साली घर बांधले. सुमारे वर्षभरापूर्वी महावितरण कंपनीने परिसरातील रहिवाशांची कोणतीही परवानगी न घेता घरांच्या
गच्चीजवळून धोकादायक पद्धतीने उच्च विद्युत वाहक तार टाकली आहे.
’महावितरणच्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जखमी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. कुटूंबाने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल.’
-राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता – चाकण उपविभागिय कार्यालय, महावितरण.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनिरूद्ध घराच्या गच्चीवर झोपायला गेला. उच्च विद्युत वाहक तारेच्या संपर्कात आल्याने त्याला शॉक बसला आणि लांब फेकला गेला. या घटनेत तो ६५ टक्के भाजला असून त्याच्या पाय, हात, पोट आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सुरूवातीला भोसरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा खर्च परवडत नसल्याने कुटंबियांनी त्याला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात हलविले. गेल्या अकरा दिवसांपासून अनिरूद्धवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून वेगवेगळ्या शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. आणखी काही शस्त्रक्रीया कराव्या लागणार आहेत. रक्तस्राव होत असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
’’महावितरण कंपनीने परिसरातील रहिवाशांची कोणतीही परवानगी न घेता घरांच्या गच्चीजवळून धोकादायक पद्धतीने उच्च विद्युत वाहक तार टाकली आहे. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे माझ्या मुलाच्या जीवावर बेतले आहे. संबंधित दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, माझ्या मुलाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महावितरण कंपनीने केला पाहिजे. मात्र, महावितरणकडून अद्यापपर्यंत कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आलेली
नाही.’’ -अर्चना पाटील (अनिरुद्धची आई)