
दौंड : मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त असताना पळून गेलेल्या एका आरोपीला जेरबंद करण्यात आले. अक्ष्या उर्फ अक्षय कोंडके चव्हाण असे या आरोपीचे नाव आल्याची माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक घुगे म्हणाले, मोक्का गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले आरोपी देवगण अजिनाथ चव्हाण (वय २५), गणेश अजिनाथ चव्हाण (वय २२, दोघे रा. बोरावकेनगर, दौंड), अक्श्या उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण (वय २२, रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड) यांच्यासह अन्य दोन आरोपी १६ जुलै २०२० रोजी कारागृहातून पळून गेले होते. यापैकी देवगण चव्हाण व गणेश चव्हाण या दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
आरोपी अक्ष्या उर्फ अक्षय कोंडके चव्हाण हा त्याच्या घरी जात येत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ४ मार्च रोजी रात्री गस्ती दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस उपनिरिक्षक शहाजी गोसावी, सुशील लोंढे व पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता.