
दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
राजेगाव : दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, वाटलूज, नायगाव, खानोटा आणि लगतच्या परिसरामध्ये शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. पिकांच्या नुकसानीचे अचूक आणि वास्तववादी पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पंचनाम्यासाठी नियुक्त केलेल्या पथकात पथकप्रमुख व महसूल अधिकारी निकिता गायकवाड, सहायक कृषी अधिकारी रवी तपकीर, ग्रामविकास महसूल अधिकारी नवनाथ चव्हाण आणि महसूल अधिकारी शशिकांत सोनावणे यांचा समावेश आहे. केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री पंचनामे न करता, या पथकाने प्रत्यक्ष शेतातील चिखल-माती तुडवत प्रत्येक पिकाची सद्यस्थिती जाणून घेतली. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट, पाण्याचा तीव्र अभाव आणि वाळलेली पिके यांची अचूक नोंद यावेळी घेण्यात आली.
दुष्काळामुळे पिके करपली
चालू हंगामात पावसाच्या तीव्र अनियमिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे राजेगाव परिसरातील हातातोंडाशी आलेली पिके जळून खाक झाली आहेत. कोरडवाहू पिकांबरोबरच बागायती पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अचूक पंचनामे होणे अत्यंत गरजेचे होते. “एकही बाधित शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे पंचनामे पूर्ण केले जात आहेत,” असा विश्वास यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांकडून कौतुक; भरपाईची प्रतीक्षा
प्रशासनाच्या या पारदर्शक आणि गतिमान कार्यपद्धतीचे राजेगाव व परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांकडून मोठे कौतुक केले जात आहे. आता हा नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर वरिष्ठ पातळीवर सादर करून शासनाने तात्काळ आर्थिक भरपाई खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी परिसरातील बळीराजाकडून केली जात आहे.