
सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत
धंगेकर पॅटर्न : कॉमन मॅनपासून आक्रमक नेत्यापर्यंत
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकर पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसब्यात धंगेकरांनी मिळवलेला विजय हा ‘कॉमन मॅन’ प्रतिमेचा विजय मानला गेला. स्कूटरवरून मतदारसंघात फिरत सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा नेता ही प्रतिमा त्यांना मोठे यश देऊन गेली.
मात्र आमदार झाल्यानंतर ही प्रतिमा हळूहळू बदलत गेली. माध्यमांतील सातत्यपूर्ण उपस्थिती, मोठ्या नेत्यांवरची तीव्र टीका आणि आक्रमक शैली यामुळे धंगेकरांचा ‘कॉमन मॅन’ कॅनव्हास धूसर होत गेला. त्याचे परिणाम लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकांत दिसून आले. यंदा महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांचा पराभव हा बदललेल्या पॅटर्नचा थेट फटका मानला जात आहे.
बिडकर पॅटर्न : शांत रणनीती, ठोस ग्राउंडवर्क
दुसरीकडे, २०१७ च्या पराभवानंतर बिडकरांनी आत्मपरीक्षण केले. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून सभागृह नेतेपदाची जबाबदारी मिळाली. यंदा पुन्हा एकदा भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून बिडकरांवर विश्वास टाकला.
शहरपातळीवरील रणनीती आखताना त्यांनी स्वतःचा जनसंपर्कही वाढवला. निवडणुकीपूर्वीच्या महिन्यांत ‘वन-टू-वन’ संपर्क, घरोघरी भेटी आणि थेट संवाद हा त्यांचा मुख्य फोकस राहिला. २०१७ मध्ये झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रचारात काटेकोर नियोजन ठेवले.
धंगेकरांकडून टीकेची झोड उठली, आरोपांचे व्हिडीओ व्हायरल झाले; मात्र बिडकरांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. माध्यमांचे कव्हरेज आक्रमक विरोधकाला मिळू नये, यासाठी त्यांनी मौनाची रणनीती स्वीकारली आणि प्रचारयंत्रणा कामावर ठेवली. शेवटच्या टप्प्यातही आरोपांना उत्तर न देता मुद्देसूद प्रचारावर भर दिला.
हे सुद्धा वाचा : राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?