
पुण्यात राजकीय तापमान पोचले शिगेला
मतदारांच्या कार्यालयाबाहेर कथित ‘काळी जादू’ केल्याची घटना
उद्या होणार पुणे महापालिकेसाठी मतदान
आकाश ढुमेपाटील/पुणे: प्रचाराची अधिकृत वेळ संपली असली, तरी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान अजूनही शिगेला पोहोचलेले दिसत आहे. पुण्यातील महर्षी नगर शनिवारी पार्क परिसरात मतदारांच्या कार्यालयाबाहेर कथित ‘काळी जादू’ केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील नैतिकता, कायदा-सुव्यवस्था आणि छुप्या प्रचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये मतदारांना विविध प्रकारे प्रलोभन दिल्याचे आरोप होत आहेत. काही ठिकाणी रोख रक्कम, तर काही ठिकाणी आश्वासनांची पेरणी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याचबरोबर काही प्रभागांमध्ये मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये ‘शिफ्ट’ करण्यात आल्याचे गंभीर आरोपही पुढे आले आहेत. या कथित प्रकारांमुळे मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रचार थांबल्यानंतरही राजकीय संघर्षाची धार कमी झालेली नाही. उलट, सोशल मीडियावर आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून विशेषतः Twitter (एक्स) वर नेते, कार्यकर्ते आणि समर्थक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. थेट सभांऐवजी आता ‘डिजिटल रणांगण’ तापले असून, व्हिडीओ, पोस्ट, आरोपपत्रे आणि प्रत्युत्तरांचा मारा सुरू आहे. नियमबाह्य प्रचार, अप्रत्यक्ष आवाहने आणि सूचक संदेशांच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
PMC Election मध्ये पीएमपी व्यस्त? प्रवाशांना मोठा फटका; १,७५० पैकी ‘इतक्या’ बस आरक्षित
राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रचारबंदीच्या काळात सुरू असलेला हा छुपा प्रचार अधिक धोकादायक ठरू शकतो. थेट भाषणांपेक्षा सोशल मीडियावरील सूचक, भावनिक आणि कधी कधी भीती निर्माण करणारे संदेश मतदारांच्या निर्णयावर खोल परिणाम करू शकतात. काळी जादूच्या कथित घटनेसारखे प्रकार हे केवळ अंधश्रद्धेचे नव्हे, तर मानसिक दबावाचे साधन असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?
दरम्यान, निवडणूक यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रचारबंदीचे काटेकोर पालन, सोशल मीडियावरील आचारसंहितेचे उल्लंघन आणि मतदारांवर होणाऱ्या अप्रत्यक्ष दबावावर नियंत्रण ठेवणे, हे प्रशासनासाठी कसोटीचे ठरणार आहे. एकीकडे ‘प्रचार संपला’ असे अधिकृत चित्र असले, तरी प्रत्यक्षात राजकारण नव्या पातळीवर सरकले असून, मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात हा छुपा प्रचार निर्णायक ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.