
आंघोळीसाठी गेलेल्या 'त्या' तरुणाचा आता मृतदेहच सापडला; आठ दिवसांनी घोड नदीपात्रात मृतदेह
मंचर : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी येथील ओढ्यात आंघोळीसाठी एक तरुण गेला होता. १७ वर्षीय दीपक सुरेश खाडे याचा मृतदेह आठ दिवसांनी दिगद परिसरातील घोड नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी (दि.२२) सकाळी साडेनऊच्या सुमारास दीपक आणि त्याचा मोठा भाऊ विकास सुरेश खाडे (वय २४) हे शेतीपंपाची मोटार काढण्यासाठी ओढ्याकाठी गेले होते. मोटार बाहेर काढल्यानंतर विकास स्टार्टर काढण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी दीपकने आंघोळ करून येतो, असे सांगत कपडे व चप्पल काठावर ठेवून पाण्यात प्रवेश केला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने विकासने शोध घेतला. मात्र, दीपक बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. घटनेनंतर स्थानिक तरुण, ग्रामस्थ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने शोधमोहीम राबविली. मात्र, मुसळधार पाऊस, ओढा व घोड नदीला आलेला पूर यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
अखेर गुरुवारी (दि.३०) दुपारी दिगद परिसरातील घोड नदीपात्रात दीपकचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती सरपंच लक्ष्मण मावळे यांनी दिली. पिंपरी येथून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
“दीपक खाडे याचा मृतदेह दिगद येथील घोड नदीपात्रात आढळून आला आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.”
– सागर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारगाव पोलीस ठाणे.
शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले
काही दिवसांपूर्वीच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर चार पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. तर एका पर्यटकाचा शोध सुरू आहे. दरम्यान बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. शिरोडा वेळागर समुद्र किनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. या ठिकाणी काही पर्यटक फिरण्यासाठी गेले होते. एकूण 8 पर्यटक शिरोडा वेळागर समुद्रात बुडाले आहेत. 8 पैकी 4 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका पर्यटकाचा शोध सुरू आहे. बुडालेल्या पर्यटकांमध्ये काही पर्यटक बेळगावचे आणि काही सिंधुदुर्गचे असल्याचे समोर आले आहे.
सेल्फीचा मोह जीवावर बेतला ! मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू