पुणे: शिक्षणाच्या माहेर घरात एक ह्रदयाला भिडणारी घटना घडली असून, कोंढव्यातील एका मुलीच्या हृदयस्पर्शी आर्त हाकेला पुणे पोलिसांचा दामिनी मार्शल विभाग मदतीला आला आहे. दामिनी मार्शलमुळे एका लहानगी मुलीचं आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे वळले असून, तीन मुलींना पुन्हा शाळेचे दार खुले झाले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोंढवा पोलिस ठाण्यातील दामिनी मार्शलवरील महिला पोलिस आयोध्या चेचर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या शाळेत शिकणारी एक हुशार विद्यार्थिनी अचानक अनुपस्थित राहू लागल्याचे सांगितले. चौकशी केली असता मुलीच्या शिक्षकांनी सांगितले, की ती मुलगी घाबरली आहे, ती काहीतरी अडचणीत असावी. दामिनी मार्शल शाळेच्या मुख्याध्यापकांसह थेट मुलीच्या घरी पोहोचल्या. घराला कुलूप होते. तरीही आत आवाज दिल्यावर ती मुलगी व तिची लहान बहिण आत असल्याचे दिसून आले. त्यांच्याशी संवाद साधला असता मुलींच्या डोळ्यातून अश्रूांच्या धाराच सुरू झाल्या. त्यांच्याकडून खरी परिस्थिती ऐकली. तेव्हा दामिनी मार्शलच्याही डोळ्यात अश्रू दरवळले.
ती सांगत होती, आम्ही तीन बहीणी आहोत. आई त्यांना घरात बंद करून दररोज भीक मागायला नेत होती. खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असताना त्या मुलींना रस्त्यावर उभे रहावे लागत होते. मलाही इतर मुलांसारखे शाळेत जायचे आहे, शिकायचे आहे, हे वाक्य ऐकून दामिनी मार्शल अधिक निर्धाराने उभ्या राहिल्या. नंतर दोन-तीन दिवस मुलींच्या आईवर लक्ष ठेवले. पुरावे गोळा करून पोलिस स्टेशनमध्ये ती महिलेला आणले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला कठोर समज देत मुलांना शाळेत पाठवण्यास सांगितले. पुढे शाळा व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मुली पुन्हा शाळेत दाखल झाल्या.
पोलिसांच्या प्रयत्नाने प्रयत्नांमुळेच तीन निरागस जिवांचे भविष्य अंधारातून प्रकाशाकडे वळले. वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक वर्षा देशमुख आणि दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांच्या प्रयत्नातून पुन्हा मुलींच्या आयुष्याला दिशा मिळाली.
आज त्या आनंदाने शिक्षण घेत आहेत. आमच्या प्रयत्नांना यश आलं, हेच खरं समाधान आहे. संवेदनशीलतेने पावले उचलली तर मुलींच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो. बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना फक्त घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात उतरताना या घटनेतून दिसून आली.
– आयोध्या चेचर, दामिनी मार्शल, कोंढवा पोलिस ठाणे.
मी त्यांना सोडून नाही राहू शकत…
आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीला तीन सावत्र भावंड आहेत. त्यातील एक बहिण सातवीत, एक दुसरीत व दोन वर्षांचा भाऊ आहे. पोलिसांनी महिला पुन्हा असे करेल याभिती पोटी लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या अनेक संस्थांशी चर्चा करून त्यांना तिथे पाठविण्यास येईल का याची चाचपणी केली. या मुलाला विचारले, तेव्हा मात्र, तिने मी या तिघांना सोडून नाही, राहू शकणार. तिथेही आम्हाला एकत्र राहण्यास मिळणार नाही. आई-वडिलांनाच तुम्ही सांगा आम्हाला एकत्र व व्यवस्थित सांभळण्यास अशी विनवणी या मुलीने केली.