Pune News : पुणे : खडकवासला ते फुरसुंगी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा केला जाणार आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. या कामासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र येत्या आठवडाभरात मिळण्याची शक्यता असून त्यानंतर लागलीच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
खडकवासला ते फुरसुंगी या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याची बचत होऊन शहरालाही जादा पाणी मिळणार आहे. जलसंपदा विभागाने बोगद्याच्या कामामुळे होणाऱ्या कंपनांचा परिणाम पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. या परिणामांचा मूल्यांकन करणारा अहवाल पर्यावरण मंत्रालयाच्या मूल्यांकन समितीला सादर केला होता. त्यात सुचविण्यात आलेले बदल पूर्ण करून अहवाल पुन्हा समितीकडे पाठविण्यात आला. आता समितीची मान्यता मिळाली आहे. समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार एक पत्र जलसंपदा विभागाला मिळणे अपेक्षित आहे. हे पत्र येत्या आठवडाभरात मिळेल. आणि त्यानंतर बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
खडकवासला धरणातील पाण्याची होणारी गळती चोरी तसेच बाष्पीभवन रोखण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान असलेल्या कालव्याच्या ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम सुरू झाले आहे. हा बोगदा जमिनीच्या ८० मीटर ते २४० मीटर खालून जाणार आहे. बोगद्याचे काम ड्रील आणि ब्लास्टिंग पद्धतीने केले जाणार आहे. बोगद्याचा अंतर्गत व्यास ६.३ मीटर असणार आहे. बोगद्याच्या आतून सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. या २८ किलोमीटरच्या लांबीत एकूण सहा ठिकाणी छेद दिले जाणार आहेत. प्रत्येक ४ किलोमीटवर हे छेद असून एकाच वेळी सहा ठिकाणी जमिनीवरून खोदकाम सुरू होणार आहे.
बोगद्यामुळे सुमारे तीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. परिणामी शहराला हे अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रामीण भागालाही जादा पाणी उपलब्ध झाल्याने अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील शेतीला सिंचन देता येणार आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १ हजार ५१० क्युसेक होणार असून वेग दीडपटीने वाढेल. हे पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे.
Web Title: Environment ministry has given permission for khadakwasla to fursungi tunnel pune news update