Shrimant Bhausaheb Rangari Ganpati was offered to the devotees with great enthusiasm by Jaya Kishori
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त बाप्पा विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.
पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूचे नगारा वादन झाले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. आगमन मिरवणूकीमध्ये बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा पथकांनी केलेले वादन होते. याचबरोबर श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवी अशी वेगवेगळी ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. तसेच कलावंत पथकात वादन करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव यांच्यासह अन्य कलाकार हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ‘श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा’ पथकाने मर्दानी खेळाचे केलेले प्रात्यक्षिक प्रत्येक चौकात भाविक-भक्तांचे आकर्षण ठरले. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा या खेळांचे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. ही लक्षवेधक मिरवणुक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा मिरवणूक रथ उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हाताने ओढण्याची सेवा केली. डोक्यावर भगवा पांढरा कुर्ता परिधान केलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक शिवाजी रस्त्यामार्गे बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोड मार्गे पुन्हा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा ‘रत्नमहाल’ येथे दाखल झाली. त्यानंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. प्रमुख विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते ‘श्री’ची आरती करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकप्रिय वक्त्या जया किशोरी म्हणाल्या की, ‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला मी सलग दुसऱ्या वर्षी येत आहे. याठिकाणी भक्ती आणि देशभक्ती या दोन्हींचा संगम आहे. यावर्षी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. मला निमंत्रित केल्याबद्दल मी पुनीत बालन यांची आभारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना आपला धर्म, आपली संस्कृती, देशभक्ती जिवंत ठेवायची आहे हे लक्षात असू द्या. हे उत्सव त्याचे प्रतीक आहे. आपल्या सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, असे जया किशोरी म्हणाल्या आहेत.