Sahyadri Hospital's liver transplant license suspended Pune News
पुणे : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल हे अतिशय चर्चेत आलेले रुग्णालय आहे. डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या या सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र मागील आठवड्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयाचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित करण्याचे निर्देश पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिले आहेत.
सह्याद्री रुग्णालयात बापू कोमकर वय ४८ यांच्यावर १५ ऑगस्टला यकृत प्रत्यारोपण झाले होते. त्यांना त्यांची पत्नी कामिनी वय ४२, दोघेही रा. हडपसर यांनी यकृताचा तुकडा दान केला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर कोमकर यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर सहा दिवसांनी त्यांच्या पत्नीचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत आरोग्य उपसंचालक कार्यालयाने त्यांना नोटीस पाठवून सोमवारी सर्व कागदपत्रे मागवून घेतली होती. रुग्णालयाने कागदपत्रे सादर केल्यावर राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सल्लागार समितीची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. यावेळी डॉ. पवार उपस्थित होते. त्यात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे व अहवाल प्राप्त होईपर्यंत यकृत प्रत्यारोपण परवान्याला स्थगिती देण्याचे ठरले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सह्याद्री रुग्णालयाला २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश सोमवारी दिले होते. त्यानुसार रुग्णालयाने त्यांचा अहवाल मंगळवारी महापालिका आरोग्य विभागाला सादर केला आहे. अहवाल पाहून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झाली आहे. त्यानुसार आम्ही आमचा जिवंत दाता यकृत प्रत्यारोपण परवाना तात्पुरता स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या इतर सर्व रुग्णालयीन सेवा, ज्यामध्ये इतर प्रत्यारोपण सेवा आणि शस्त्रक्रिया आहेत, त्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे अधिकृत सह्याद्री रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.