File Photo : Nylon Manja
नागपूर : कर्तव्यावर जात असताना नायलॉन मांजा अचानक एका तरुणीच्या गळ्याला गुंडाळला गेला. मात्र, डोक्यात हेल्मेट आणि गळ्याला स्कार्प गुंडाळून होता म्हणून तिचा जीव वाचला. अन्यथा तिचा गळा चिरला असता मांजा हेल्मेटमधून डोक्याला घासत गेला आणि नाक चिरले. शीतल खेडकर असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मॉरेस टी पॉइंटसमोर घडली. डॉक्टरांनी तीन टाके लावले. आता ती सुखरूप आहे.
हेदेखील वाचा : सिंहगड रोड पोलिसांची दुहेरी कारवाई; नायलॉन मांजा विकणाऱ्याला पकडले अन्…
शीतल सीताबर्डी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहे. घटनेच्या वेळी ती कर्तव्यावर जात होती. नायलॉन मांजाने इजा होऊ नये म्हणून बहुतांश वाहन चालक गळ्याला स्कार्प गुंडाळूनच होते. दरम्यान, शीतल झिरो माईल चौकातून सीताबर्डीकडे जात असताना मॉरेट टी पॉईंटजवळ मांजा गळ्याभोवती गुंडाळला. स्कार्प गुंडाळून असल्याने गळा वाचला. मांजा हेल्मेटमधून नाकाला घासत गेला. मांजामुळे कपाळ आणि नाकाच्या वरच्या भागाला खोलवर जखम झाली. रक्तबंबाळ होताच तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तिला भोवळ यायला लागली. कशीबशी तिने दुचाकी थांबवली. जवळपासचे लोक मदतीला धावले. जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तीन टाके लावले. आता ती सुखरुप आहे.
दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकला मांजा
तिसरी घटना, कोराडी मार्गावर घडली. पुलावरून जात असताना एका मोटारसायकलस्वाराच्या गळ्यात मांजा अडकला. गळा चिरला जाऊन रक्ताची धार लागली. स्थानिक लोक मदतीला धावले. जखमीला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौथी घटना पांढराबोडी परिसरात घडली. एक युवक रस्त्याने जात असताना नायलॉन मांजाने त्याच्या हाताची बोटे कापली. तो रक्तबंबाळ झाला. लोकांनी त्याच्या हाताला पट्टी बांधल्यानंतर रुग्णालयात नेले. त्याच्या बोटावर टाके पडले. अशाप्रकारे मंगळवारी अनेक लोक नायलॉन मांजाला बळी पडले.
महिलेच्या चेहऱ्याला टाके
या मांजामुळे इजा होण्याची दुसरी घटना मानकापूर उड्डाणपुलावर मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. रोशनी अजय बागडे (वय 35, रा. आदर्शनगर, महादुला) असे जखमी महिलेचे नाव आहे.
नायलॉन मांजावर पोलिसांची करडी नजर
नागपुरात पोलिस सर्व बाजारपेठेत पायी गस्त घालत असून, पतंग व मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवून आहेत. पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरताना दिसल्यास संबंधितांवर कलम 223 आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. जास्तीत जास्त 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय 5 हजार रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.






