
Elections have been announced for 5 Zilla Parishad constituencies and 10 Panchayat Samiti constituencies in Vadgaon Maval
वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गण यांची निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मावळ–मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करतील. दि. १६ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार असून दि. २१ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून दि. २७ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हिंमतीवर झालेले मुख्यमंत्री नाही; राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
दि. ५ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि. १० फेब्रुवारी २०२६ (मंगळवार) रोजी मतमोजणी होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे त्याच दिवशी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तात्काळ लागू झाली असून राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांकडून तयारीला वेग आला आहे. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे यावेळी निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मावळ तालुक्यातील गट व गणनिहाय मतदारसंख्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यानुसार मावळ तालुक्यात एकूण २ लाख ३१६ मतदार असून त्यामध्ये १,०२,०८२ पुरुष, ९८,२२६ महिला व ८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : संध्याकाळी ५ वाजता लागेल आचारसंहिता! ती नेमकी कधी लागू होते? काय असतात नियम? जाणून घ्या
जिल्हा परिषद गटनिहाय मतदारसंख्या
टाकवे बुद्रुक – ३९,५४७
इंदुरी – ३६,२८०
खडकाळे – ३९,१०३
कुसगाव बुद्रुक – ३९,६११
सोमाटणे – ४५,७७५
(एकूण मतदार : २,००,३१६)
पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या
टाकवे बुद्रुक – १९,८३९
नाणे – १९,७०८
वराळे – १९,७८१
इंदुरी – १६,४९९
खडकाळे – २०,४२९
काळा – १८,६७४
कुसगाव बुद्रुक – १५,४१२
काळे – २४,१९९
सोमाटणे – २२,८११
चांदखेड – २२,९६४
पंचायत समिती गणांमध्येही एकूण मतदारसंख्या २,००,३१६ इतकीच आहे.