
मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात पावसाचे अनियमित आणि अपुरे प्रमाण यामुळे तालुक्यातील मुख्य पीक असलेले भातपीक करपू लागले असून, इतर पिकांचेही नुकसान होत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलती व लाभ येथील शेतकऱ्यांनाही मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
मावळ तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने भातपिकाला मोठा फटका बसत आहे. शेतातील भातरोपे पाण्याअभावी करपू व वाळू लागली आहेत. भात हे तालुक्यातील प्रमुख पीक असल्याने त्याचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर पिकांनाही पावसाच्या कमतरतेचा फटका बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी
सध्याची शेतीची परिस्थिती, पिकांचे होणारे नुकसान आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. मावळ तालुक्यातील शेतीच्या परिस्थितीची पाहणी करून वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाकडून विविध सवलती आणि मदतीचे लाभ दिले जातात. त्याच धर्तीवर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आवश्यक मदत मिळावी. पावसाअभावी होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
हे सुद्धा वाचा : गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर, निगडेचे लोकनियुक्त सरपंच भिकाजी भागवत, कल्हाटचे सरपंच शिवाजीराव करवंदे, कोंडीवडे (आं. मा.)चे सरपंच विश्वनाथ मुंढारकर, माजी सरपंच मोहन घोलप, संभाजी कडू, गोपाळ पवळे, मनोज करवंदे, बळीराम भोईरकर, रवींद्र पवार, उद्योजक योगेश गायकवाड, हिंदवी ट्रस्टचे अध्यक्ष संदीप कल्हाटकर, गावाध्यक्ष भरत अंभोरे, नवनाथ मालपोटे, शंकर अगिवले, अजित कडू आणि बाळू पवळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन शासनाकडे कोणती भूमिका मांडते आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.