दुष्काळाची भीषण तीव्रता झाली असह्य; पावसासाठी गणरायाला साकडे (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
राजेगाव : दुष्काळाची भीषण तीव्रता आता असह्य झाली असून, राजेगाव आणि परिसर निसर्गाच्या अवकृपेने होरपळून निघत आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी शेतीला उपयुक्त असा पाऊस झालेला नाही. बाप्पाचे आगमन झाले तरी आकाशात ढगांची गर्दी असूनही पावसाचा पत्ता नाही. अखेर हताश आणि निराशाग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणी पावसासाठी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागात सध्या गणपती उत्सवाच्या मंडपांमध्ये आणि घराघरांतून केवळ एकाच प्रार्थनेचा सूर ऐकू येत आहे – “गणराया, भिजव आता रान !” दुष्काळाच्या छायेमुळे हवालदिल झालेला बळीराजा विविध मार्गांनी देवाला आळवत आहे. “दुष्काळ नको रे बाबा”, “दुष्काळ सरता सरेना, वरुणराजा आता तरी बरस” अशा हृदयस्पर्शी काव्यपंक्ती आणि आरतीच्या माध्यमातून शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक नागरिक गणरायाकडे डोळ्यात पाणी आणून पावसाची विनवणी मागत आहे.
Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
स्वतःच्या चुकांची जाणीव आणि निसर्ग संवर्धनाचा वसा यंदाच्या दुष्काळाने ग्रामस्थांना एक महत्त्वाची जाणीव करून दिली आहे. वाढती पाणीटंचाई आणि पावसाची अनियमितता याला मानवी हस्तक्षेप आणि निसर्गाचा झालेला ऱ्हास जबाबदार आहे, हे आता राजेगावातील नागरिकांना पटू लागले आहे. या जाणिवेधूनच गावात एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण
अनेकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प केला आहे, तर काहींनी झाडे लावण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागात निसर्ग बचावाच्या या संकल्पना हळूहळू रुजू लागल्या असून, ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. मात्र, केवळ लोकसहभाग पुरेसा नसून शासनानेही या उपक्रमांची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीच्या आणि जलसंधारणाच्या योजना कागदावर न ठेवता प्रशासनाने प्रत्यक्ष ध्येय ठरवून राबवायला हव्या आहेत.
निसर्गाने यंदा तरी कृपा करावी, वरुणराजाने धो-धो बरसून सुकलेली पिके आणि कोरडी पडलेली शेते फुलवावीत, हीच एकच प्रार्थना सध्या राजेगावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या मुखात आहे. गणराया या बळीराजाची हाक ऐकून पावसाची सर कोसळवणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.






