संग्रहित फोटो
सटाण : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बागलाण तालुक्यातील नामपूर-द्याणे दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे. गणेशोत्सवाच्या आनंदावर या दुर्घटनेने विरजण पडले असून, नामपूरसह मोसम खोऱ्यावर शोककळा पसरली आहे. गणपती विसर्जनाच्या उत्साहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नामपूर येथील एका खासगी शिकवणीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी संबंधित शिक्षक आणि विद्यार्थी द्याणे शिवारातील बंधाऱ्यावर गेले होते. विसर्जनाच्या वेळी नामपूर येथील ऋतिक दादाजी वाघ (वय १७) आणि उत्राणे येथील अथर्व दीपक पगार (वय १७) हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ बंधाऱ्यात शोध सुरू केला. अथर्व पगार याचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. ऋतिक वाघ हा वाळूत रुतल्याने त्याचा शोध घेण्यासाठी मालेगाव येथून पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने ऋतिकचा शोध घेण्यात आला.
दोन्ही विद्यार्थी अवघ्या १७ वर्षांचे असल्याने या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच बंधाऱ्यावर नागरिक, तरुण आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. गणपती विसर्जनाच्या उत्साहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात
पाटस-दौंड अष्टविनायक रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाटस येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम यांनी दिली. शुभम मिनानाथ शितोळे (वय २५ रा. पाटस, देशमुखवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, गजानन आत्माराम इंगळे (, रा. पारंबी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हा दुचाकी चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याचावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवार, दिनांक ११ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास पाटस-दौंड रोडवरील जुन्या इरिगेशन कॉलनीजवळील धोकादायक वळणावर घडली आहे.






