पुणे: राज्यभरात मान्सूनचा जोर वाढत असून पुणे शहर आणि उपनगरांत विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण राहून संध्याकाळी सातच्या सुमारास पावसाने अचानक सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच राहिला. विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे रस्ते घसरडे होऊन वाहने रस्त्याच्या कडेला थांबल्याचे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे गुरुवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण राहून सुरू झालेल्या पावसाने शहरातील विविध भागात पाण्याचे पाट वाहिले. जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हवामान विभागाने पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट दिला आहे.
पुण्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहून शहरात कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. शनिवारी मात्र, पावसाचा जोर अधिक वाढणार असून आकाश ढगाळ राहून पाऊस पाडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस पुण्यात आणि राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि झाडांखाली थांबण्याचे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यातील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर शहरात पुढील 4 ते 5 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तळकोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार?
राज्यात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आज राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेले दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.
Monsoon Alert Update: तळकोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार? दोन दिवस कसे असणार वातावरण?
कोल्हापूर शहरात आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. तळकोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.