
हिंजवडी मेट्रोची पाचवी डेडलाईनही हुकणार; मुख्यमंत्र्यांच्या तंबीलाही वाटाण्याच्या अक्षता
पिंपरी / विजया गिरमे : पुणेकरांच्या, विशेषतः आयटी क्षेत्रातील नोकरदारांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या अत्यंत महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याचे स्पष्ट संकेत आहेत. येत्या १५ जुलै रोजी या मार्गावर मेट्रो धावेल, असे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने केले होते. मात्र, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र अद्याप रखडल्यामुळे हा हक्काचा मुहूर्तही हुकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ च्या संथ आणि ढिसाळ कारभारामुळे हिंजवडीतील तब्बल १० लाख आयटीयन्सच्या संयमाची परीक्षा पाहिली जात असून, प्रवाशांमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महानगर आयुक्त अभिजीत चौधरी यांनी विकासक कंपनी ‘PITCMRL’ला वारंवार कडक शब्दांत तंबी दिली होती. तरीही मेट्रो सेवा सुरू होण्यास होत असलेला हा विलंब थेट प्रशासकीय समन्वयाच्या अभावावर बोट ठेवणारा आहे.
माण ते बालेवाडी दरम्यानच्या १२ स्थानकांच्या पहिल्या टप्प्याची प्रत्यक्ष सुरक्षा तपासणी ‘सीएमआरएस’कडून नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत सुरक्षा आयुक्त आपला अंतिम अहवाल आणि व्यावसायिक वाहतुकीसाठीचे सुरक्षा प्रमाणपत्र सुपूर्द करत नाहीत, तोपर्यंत या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करता येणार नाही.
ऑगस्ट उजाडल्याशिवाय मेट्रो सुरू होणे अशक्यप्राय
‘पीएमआरडीए’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमआरएसचा अहवाल हाती आल्यानंतरही प्रत्यक्ष मेट्रो धावण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतील. यावरून जुलैअखेर किंवा थेट ऑगस्ट उजाडल्याशिवाय मेट्रो सुरू होणे आता निव्वळ अशक्यप्राय दिसत आहे.
पाचव्यांदा हुकली डेडलाईन
२३ किलोमीटरच्या या संपूर्ण कॉरिडॉरसाठी पीएमआरडीएने आतापर्यंत तब्बल पाच वेळा अंतिम मुदत (डेडलाईन) बदलली आहे. सुरुवातीला संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, काम वेळेत पूर्ण होत नसल्याचे पाहून राज्य सरकारने मार्च महिन्यात धोरणात्मक बदल करत ‘फेज रोलआऊट’ (टप्प्याटप्प्याने मार्ग सुरू करणे) करण्याचा निर्णय घेतला.