Pimpri-Nigdi Metro विस्ताराला मोठा वेग! अखेर चौथ्या स्थानकाला मंजुरी; महापालिकेकडून २५ कोटींची तरतूद
Pimpri-Nigdi Metro Update: महामेट्रोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गावरील अतिरिक्त चौथ्या स्थानकाचा (स्टेशन) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या सभेमध्ये या स्थानकासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या या विषयावर अखेर पडदा पडला असून, निगडी परिसरातील नागरिकांना आता मेट्रो सेवेचा अधिक कार्यक्षम लाभ घेता येणार आहे.
पिंपरी ते निगडी या भागात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रजोपर्यंत महामेट्रो या भागातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करत नाही, तोपर्यंत अतिरिक्त अनुदान मंजूर केले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीने घेतली होती. याच वादामुळे मे महिन्यात ही मंजुरी दोन वेळा तहकूब करण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासन आणि महामेट्रो यांच्यातील समन्वयानंतर अखेर बुधवारी या खर्चास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) वतीने पुणे मेट्रो फेज-१ चे विस्तारीकरण निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत केले जात आहे.
मूळ मार्गिकाः साडेचार किलोमीटरची उन्नत (उंचावलेले) मार्गिका.
नियोजित स्थानके: चिंचवड, आकुर्डी आणि भक्ती-शक्ती.
चौथे स्थानक का?: निगडी परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी विचारात घेऊन केंद्र सरकारने चौथ्या स्थानकास मंजुरी दिली होती.
खर्चाचे गणितः या प्रकल्पाचा मूळ खर्च ९१० कोटी रुपये इतका होता. मात्र, या अतिरिक्त स्थानकामुळे प्रकल्पाचा खर्च ५० कोटी रुपयांनी वाढला असून, आता एकूण प्रकल्प खर्च ९६०.१८ कोटीवर पोहोचला आहे. या वाढीव ५० कोटीपैकी रुपये २५ कोटी रुपये राज्य सरकारच्या नागरी परिवहन निधीतून, तर उर्वरित २५ कोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.
पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत करण्याच्या प्रस्तावाला ऑक्टोबर २०२३ मध्ये मान्यता मिळाली होती. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पासाठी विविध स्तरांतून – मिळालेला निधी खालीलप्रमाणे आहे:
केंद्र सरकार ६७ कोटी
राज्य सरकार ७९ कोटी
अतिरिक्त स्थानक (राज्य नागरी परिवहन निधी) २५ कोटी
अतिरिक्त स्थानक (पिंपरी-चिंचवड महापालिका) २५ कोटी
प्रकल्पाचा एकूण सुधारित खर्च ९६०.१८ कोटी
स्थायी समितीकडून २५ कोटी रुपयांच्या महापालिकेच्या वाट्याला मंजुरी मिळाल्याने आता या चौथ्या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला मोठी गती मिळणार आहे. निगडी आणि परिसरातील नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी हे चौथे स्टेशन वाहतूक कोंडीतून सुटका करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






