Temghar Dam: 'टेमघरची पाणी गळती न रोखल्यास पुण्यास...'; काय होता तज्ज्ञांचा इशारा? दुरुस्तीसाठी सरकारकडून ३१५ कोटी मंजूर
पुणे: पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचे असे टेमघर धरण तातडीने दुरुस्त करण्याची पावले उचलण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. धऱणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पुण्याच्या ऊर्ध्व भागात वसलेले हे धरण पुणे महानगरासाठी धोकायदायक ठरू शकेल असा इशारा तज्ज्ञ समित्यांनी वेळोवेळी दिला होता.
टेमघर धरणातील पाणी गळती तातडीने थांबवण्याची पावले उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय़ राज्य सरकारने घेतला असून आज मंत्रीमंडळाने या दुरुस्तीसाठी ३१५ कोटी पाच लक्ष इतका निधी मंजूर केला आहे.
जलसंपदेसंबंधी केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या विविध समित्यांनी या दुरुस्त्या लौकर कराव्या लागतील असा इशारा वारंवार दिला होता. जलसंपदा विभागाने या संबंधी मंत्रीमंडळाला सादर केलेल्या टिप्पणीत असे स्पष्ट नमूद केले होते की धरण सुरुक्षितता कायदा २०२१ मधील विविध कलमे टेमघरला लागू होतात. जर यातून काही दुर्घटना घडली तर पुणे शहराला त्याचा मोठा धोका उद्भवू शकतो. तसेच यातून निर्माण होणाऱ्या कायेदशीर कटकटीही अधिक मोठ्या असू शकतात.
या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता सद्यस्थितीत हाती घेण्यात आलेल्या टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजना व प्रस्तावित टेमघर धरण मजबूतीकरण कामांच्या खर्चाला आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
समितीच्या अहवालानंतर कामांना मान्यता
टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अब्ज घन फूट पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याद्वारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामास मान्यता दिली.
कोयना जलाशयातील बंधाऱ्यांसाठी १७० कोटी रूपयांची तरतूद
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येतात. या जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.